वृत्तसंस्था/ अगरताला
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सोमवारी झालेल्या इलाईट क गटातील सामन्यात कर्नाटकाने त्रिपुराचा 29 धावांनी पराभव करत पूर्ण गुण वसुल केले. कर्नाटकाच्या विजय कुमार विशाखला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात कर्नाटकाने पहिल्या डावात 241 धावा जमविल्यानंतर त्रिपुराचा पहिला डाव 200 धावात आटोपला. कर्नाटकाने 41 धावांची आघाडी मिळविली होती. कर्नाटकाने दुसऱ्या डावात 151 धावा जमवित त्रिपुराला निर्णायक विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर त्रिपुराने 3 बाद 59 या धावसंख्येवरुन सोमवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 163 धावात आटोपला. त्रिपुराच्या दुसऱ्या डावात सुदीप चटरजीने 10 चौकारांसह 82 तर सतिशने 4 चौकारांसह 22 आणि एस. पॉलने 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे व्ही. कवीरप्पाने 44 धावात 4 तर विजयकुमार विशाखने 62 धावात 3 तसेच कौशिकने 1 गडी बाद केला. या सामन्यात विशाखने 6 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – कर्नाटक प. डाव 241 , त्रिपुरा प. डाव 200, कर्नाटक दु. डाव सर्व बाद 151, त्रिपुरा दु. डाव 55.2 षटकात सर्व बाद 163 (सुदीप चटरजी 82, गणेश सतिश 22, एस. पॉल 21, कवीरप्पा 4-44, विशाख 3-65).









