राज्यपाल गेहलोत यांचे प्रतिपादन : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ : राज्य सरकारच्या विविध विकासकामांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
शेतकरी, कामगार, गरीब, दुर्बल घटक, वंचितांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. विकासपथावर कर्नाटक अग्रेसर आहे, असे प्रतिपादन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. शुक्रवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून ते बोलत होते. दरम्यान, आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास पायाभूत सुविधा, समाजकल्याण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम खात्यासह विविध खात्यातील सरकारच्या विकासकामांची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. सकाळी 11 वाजता राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे विधानसौधसमोर आगमन झाले. यावेळी सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी, बसवराज होरट्टी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यपाल पुढे म्हणाले, विकास कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात कर्नाटक हे देशातील आघाडीचे राज्य आहे. अनेक आघाड्यांवर नवे नियोजन कार्यक्रम राबवून इतर राज्यांसाठी मॉडेल बनले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेसाठी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या सभागृहात होणारी चर्चा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी होकायंत्र ठरणार असून नवीन कर्नाटकच्या उभारणीला हातभार लावेल, अशी आशा आहे. शेतीच्या विकासासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. गाईंच्या रक्षणासाठी गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विद्यानिधी योजना, शून्य व्याजदराने 15 हजारांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावषीपासूनच यशस्विनी योजनाही पुन्हा लागू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने ग्रामीण विकासासाठी राबविलेल्या योजनांच्या अंमलबजावणीची माहिती देताना, घरोघरी पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेच्या प्रगतीचा उल्लेख करून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाच्या प्रगतीचा तपशील आपल्या भाषणात दिला.
आरक्षणात वाढ
राज्य सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात वाढ करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. तसेच त्यांच्या विकासासाठी एससीपी आणि टीएसपी अंतर्गत 29 हजार कोटी ऊपये देण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना राज्यपाल म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे शिक्षणाला चालना देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खोल्या आणि शौचालये बांधण्यासाठी 1923.5 कोटी अनुदान देण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या 46 लाख विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनासोबत अंडी किंवा केळी देण्यासाठी 132.42 कोटी ऊपये देण्यात आले आहेत. विद्याविकास योजनेंतर्गत 61 लाख विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यापुस्तके, 46 लाख विद्यार्थिनींना गणवेश आणि बूट देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
7 नवीन विद्यापीठे स्थापन
उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पावले उचलली जात असून 7 नवीन विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत. 7 अभियांत्रिकी महाविद्यालयांचा आयआयटी धर्तीवर दर्जा वाढविण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबांना 75 युनिट मोफत वीज दिली जात आहे. त्यांना देण्यात येणारा वसती सहाय्य धन वाढवून 2 लाख करण्यात आला आहे. 100 आंबेडकर वसतिगृहांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून या समाजातील 133 विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी देण्यात आली आहे, असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सांगितले.
बेळगावमध्ये सैनिक स्कूलची स्थापना
संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने बेळगावमध्ये सैनिक स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील 29 भागात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमासह डॉ. एपीजे अब्दुल कलाम निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. महिला आणि बालकांकडेही सरकारने लक्ष दिले असून 52 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार दिला जात आहे. क्षीरभाग्य आणि सृष्टी योजना मध्यम कुपोषित बालकांपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. राज्यात 4244 नवीन अंगणवाड्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
अंगणवाडी कार्यकर्त्यांचा भत्ता 1000 ऊपयांवरून 1500 ऊपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातही शासनाने प्रगतीपथावर प्रगती केली असून राज्यातील शहरी भागात 438 दवाखाने सुरू करण्यात येत असून 271 दवाखाने रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहेत. राज्यात विनाअडथळा वीज पुरवठा होत असून कोळशाचा तुटवडा असतानाही वीज पुरवली जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राज्यातील कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. 2019 ऑगस्टपासून आतापर्यंत विविध गृहनिर्माण योजनांतर्गत 7,500 कोटी रुपयांच्या खर्चातून 4.93 लाख घरे बांधण्यात आली आहेत. 11 हजार हक्काचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत झोपडपट्टीत राहणाऱ्या दीड लाख कुटुंबांना हक्कपत्र देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची अनुपस्थिती
विधिमंडळाचे अधिवेशन शुक्रवारी सुरू झाले असून पहिल्याच दिवशी अनेक विरोधी पक्षातील नेते अनुपस्थित असल्याचे दिसून आले. यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी अनुपस्थित होते. याशिवाय विरोधी पक्ष काँग्रेसचे उपनेते सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर हेही उपस्थित नसल्याचे दिसून आले.
विविध मान्यवरांना श्रद्धांजली
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहे बोलावून दिवंगत मान्यवरांना श्र्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार डॉ. हेग्गप्पा देशप्पा लमाणी, पेरीटी तिम्मप्पा हेगडे, शिवानंद अंबळगट्टी, ज्ञानयोगाश्र्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी, उद्योगपती एम. के. पांडुरगशेट्टी, गायिका वाणी जयराम, कलाकार बीकेएस वर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आली.









