राज्यसभा निवडणूक : काँग्रेस-निजदमध्ये रस्सीखेच : ‘डाव’ साधण्यासाठी भाजपचीही मोर्चेबांधणी
प्रतिनिधी /बेंगळूर
कर्नाटक विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. चार जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून विधानसभेतील सदस्यबळानुसार भाजपला दोन आणि काँग्रेसला एक जागा सहज मिळणार आहे. मात्र, चौथ्या जागेसाठी चुरस असून तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत विधानसौधमध्ये मतदान होणार असून सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
चौथ्या जागेसाठी काँग्रेस आणि निजदमध्ये एकमत होत नसल्याने याचा भाजपला लाभ होण्याची चिन्हे आहेत. अखेरच्या क्षणी निजद आणि काँग्रेसमध्ये हातमिळवणी झाली तर राज्यसभेच्या चौथ्या जागेच्या निकालाचे चित्र पालटू शकते.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, अभिनेता जग्गेश आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य लेहरसिंग यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर काँग्रेसने माजी केंदीय मंत्री जयराम रमेश व मन्सूर अली खान यांना तर निजदने कुपेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या तिसऱया उमेदवाराचा विजय टाळण्यासाठी मागील चार दिवसांपासून काँग्रेस आणि निजदमध्ये खलबते झाली आहेत. परंतु, प्रतिष्ठेमुळे या दोन्ही पक्षांमध्ये एकजूट झालेली नाही. शुक्रवारी सकाळपर्यंत दोन्ही पक्ष एकमेकांना माघार घेण्यासाठी दबाव आणू शकतात.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि निजद नेते कुमारस्वामी यांच्यातील राजकीय वैर यामुळे निजद आणि काँग्रेसने आपल्या पक्षाचा उमेदवार मागे घेतलेला नाही. चौथ्या जागेसाठी कोणत्या पक्षाच्या आमदाराने पक्षविरोधी मतदान केले हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.
भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
शुक्रवारी राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या बेंगळूरमधील निवासस्थानी प्रमुख भाजप नेत्यांची बैठक झाली. यावेळी पक्षाचे तिसरे उमेदवार लेहरसिंग यांना निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यात आली. काँग्रेसकडूनही दुसरा उमेदवार मन्सूर अली खान यांना निवडून आणण्यासाठी इतर पक्षातील आमदारांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.
निजदने आमदारांना हॉटेलमध्ये हलविले
राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षातील आमदार विचलित होऊन अन्य पक्षांकडे वळू नयेत यासाठी निजदने आपल्या आमदारांना बेंगळूरमधील आलिशान हॉटेलमध्ये नेले आहे. पक्षातील आमदारांकडून क्रॉस वोटींग होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना हॉटेलमध्ये हलविले. शुक्रवारी मतदानाच्या वेळीच या आमदारांना विधानसौधमध्ये आणण्यात येणार आहे. शुक्रवारी राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे निजदने गुरुवारी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली. आधी ही बैठक व्हाईटफिल्ड येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजिण्यात आली होती. याकरिता माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 10 आमदारांसोबर रिसॉर्टमध्ये वास्तव्य केले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत उर्वरित आमदारांना रिसॉर्टवर येण्याची सूचना केली होती. मात्र, गुरुवारी सकाळीच आमदारांना गोरगुंटेपाळय़ येथील हॉटेलमध्ये नेण्यात आले. पक्षातील आमदारांकडून क्रॉस वोटींग होऊ नये, यासाठी निजदश्रेष्ठींनी खबरदारी घेतली आहे.
पक्षनिहाय उमेदवार
भाजप
- निर्मला सीतारामन
- जग्गेश
- लेहरसिंग
काँग्रेस
- जयराम रमेश
- मन्सूर अली खान
निजद : कुपेंद्र रेड्डी









