पक्षाशी आता कुठलेच नाते नसल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था/ जम्मू
वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी काँगेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेसला आता जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक मोठा झटका बसू शकतो. महाराज हरि सिंह यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह यांनीही काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. 1967 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, परंतु आता पक्षाशी माझे संबंध नसल्यात जमा आहेत. मागील 8-10 वर्षांपासून मी खासदार नाही, तसेच काँग्रेस कार्यकारिणी समितीतूनही मला वगळण्यात आले आहे. मी काँग्रेसमध्ये असलो तरीही माझा कुणासोबतच संपर्क नसल्याचे कर्ण सिंह यांनी म्हटले आहे.
कर्ण सिंह यांचे हे वक्तव्य काँग्रेस पक्ष सोडण्याचा संकेत असल्याचे मानले जात आहे. जम्मू-काश्मीरचे अखेरचे महाराज हरि सिंह यांचे पुत्र कर्ण सिंह हे 1967-73 पर्यंत केंद्रीय मंत्री होते. परंतु मागील काही वर्षांपासून ते पक्षाच्या मुख्य प्रवाहात नाहीत. गुलाम नबी आझादांप्रमाणेच कर्ण सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध आहेत. कर्ण सिंह यांच्या एका पुस्तकाचे अनावरण अलिकडेच पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते.
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यावर वेगळा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आझाद हे सातत्याने जाहीर सभा घेत राहुल गांधींवर टीका करत आहेत.









