कुंभोज प्रतिनिधी
Kolhapur News : कर्मवीर पद्मभूषण भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज येथे झाला आहे.येथील कुमार विद्यामंदिर या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतले.या शाळेचा समावेश महापुरुषांच्या शाळा विकास यादीमध्ये करून निधी मिळावा अशी मागणी कुंभोज गावातून होत आहे. सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेल्या महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्या शाळांचा विकास राज्य सरकारकडून केला जाणार आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये कर्मवीर अण्णा यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या कुंभोज मधील कुमार विद्या मंदिर कुंभोज (सध्या केंद्रीय प्राथमिक शाळा क्र.६२ कुंभोज) या शाळेचा समावेश करण्यात आला नाही.
सदर शाळेमध्ये थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षण घेतले आहे तसे दस्तऐवज उपलब्ध आहेत. राज्यातील १३ शाळांना १४ कोटी ३० लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहेत.त्या धर्तीवर कुंभोज मधील जिल्हा परिषद शाळेचा विकास व्हावा अशी इच्छा कुंभोज ग्रामस्थातून होत आहे. गेले १ महिना विविध माध्यमातून ही मागणी होत आहे. पण शासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी १० ते ५ या वेळेत कुंभोज येथील कर्मवीर अण्णांच्या अर्ध पुतळ्यासमोर एकदिवसीय लाक्षणिक आत्मक्लेष उपोषणाचा इशारा दिला आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील व उपाध्यक्ष आदींनी केले आहे.