उदगाव, वार्ताहर
Kolhapur News : सेवकांच्या पगारातून दहा टक्के रक्कम आई-वडिलांना देण्याचा संकल्प कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था सांगली यांनी केला असून, याची घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. एक नवीन संकल्पना राबवत सहकार क्षेत्रामध्ये या संस्थेने सामाजिक दृष्ट्या एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था मर्या.सांगली या संस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.
यावेळी चालू आर्थिक वर्षाकरिता संस्थेने सभासदांसाठी पंधरा टक्के लाभांश जाहीर केला.त्याचप्रमाणे एक महत्त्वपूर्ण संकल्प करताना सेवकांच्या पगारातून दहा टक्के रक्कम आई-वडिलांच्या सेविंग खात्याला देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत सर्व सेवक व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात केले. आई वडील ही माणसांची दैवते असून त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या पवित्र कार्याचे पालन आम्ही कृतीने पूर्ण करत असल्याचे यावेळी अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, नजीकच्या काळात संस्थेची सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे,सभासदांचे जीवन आनंदी बनवणे, त्यांच्या पैशाची व वेळेची बचत करत त्यांना आधुनिक सेवा प्रदान करणे त्याचप्रमाणे सेवक वर्गामध्ये सेवाभावी वृत्तीची वाढ करणे याला प्राधान्य देण्याची ग्वाही सभासदांना दिली .संस्थेचे प्रगतीचे श्रेय त्यांनी संचालक मंडळ ,सभासद व सेवक यांच्या प्रयत्नांना दिले.विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांनी केले यावेळी सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली .संस्थेचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा उपस्थित सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बि डी वांगीकर ,प्राध्यापक एम एस रजपूत ,अशोक फावडे सुहास मगदूम, राजकुमार शेरेकर, शिवाजी पाटील, विनोद पाटोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ.अशोक सकळे,संचालक अॅड एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, ए. के. चौगुले नाना,डॉ. एस. बी. पाटील, चेतन पाटील ,संचालिका भरती चोपडे,बजरंग माळी ,अमोल रोकडे तज्ञ संचालक डॉ.नरेंद्र खाडे,लालासो थोटे यांच्यासह कर्मचारी वर्ग तसेच सभासद उपस्थित होते. आभार संचालक वसंतराव नवले यांनी मानले.









