दैव देते, पण कर्म नेते अशी म्हण आहे. एखादे घबाड केवळ सुदैवाने हाती लागावे पण त्याचा उपायोग चांगल्या प्रकारे करता न आल्याने ते नष्ट व्हावे, असा या म्हणीचा अर्थ आहे. असा अनुभव अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे असणाऱ्या स्टीफन थॉमस याला या म्हणीच्या उलटा अनुभव आला आहे. म्हणजेच त्याने जे कर्म केले त्यापासून त्याला मोठा लाभ होणार होता. पण त्याच्या दुर्दैवाने तो झाला नाही. त्यामुळे कर्माने दिले, पण दैवाने हिरावले, असे त्याच्यासंदर्भात घडले.
त्याने 2011 मध्ये अवघ्या साडेतीन लाख रुपयांमध्ये 7,002 बिटकॉईन्स खरेदी केल्या होत्या. त्यावेळी त्या अक्षरश: कवडीमोल भावाने मिळत होत्या. त्यावेळी एका बिटकॉईन या आभासी चलनाची किंमत एका कॉईनला 50 रुपये होता. आज एका बिटकॉईनची किंमत जवळपास 50 लाख रुपये आहे. त्या हिशेबाने आज तो 3 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैशाचा मालक आहे. त्याला हे पैसे त्याच्याकडील बिटकॉईन्स विकल्यानंतर मिळणार आहेत. पण त्याचे दुर्दैव असे की, एका समस्येमुळे तो आपल्याकडील बिटकॉईन्स विकू शकत नाही.
कारण, बिटकॉईन हे आभासी चलन आहे. त्याचे व्यवहार केवळ ऑनलाईन होऊ शकतात. त्यामुळे या चलनाची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी पासवर्डची आवश्यकता असते. स्टीफन थॉमस हा पासवर्ड विसरला आहे. वस्तुत: त्याने आपला पासवर्ड सुरक्षित रहावा म्हणून आयरनके नामक इस्क्रिप्शन डिव्हाईसमध्ये त्याने पासवर्ड सुरक्षित ठेवला होता. पण नंतर तो या डिव्हाईचा पासवर्ड विसल्याने त्याला बिटकॉईनचे व्यवहार करता येईनासे झाले आहेत. त्याने अनेक पासवर्ड उपयोगात आणले आहेत. तथापि, एकही चाललेला नाही. बिटकॉईनच्या नियमानुसार केवळ विशिष्ट संख्येइतकेच प्रयत्न करता येतात. ती संख्या संपेपर्यंत तुम्ही विविध पासवर्ड उपयोगात आणून प्रयत्न करु शकता. पण ही मर्यादा संपली की तुमचे पैसे गेले असाच त्याचा अर्थ होतो. थॉमस याच्याजवळ आता फक्त 2 प्रयत्न उरलेले आहेत. मात्र ते उपयोगात आणण्याचे धाडस त्याला नाही. कारण हे प्रयत्न वाया गेले त्या त्याला सर्व पैशावर पाणी सोडावे लागणार आहे. त्याला त्याचा पासवर्ड अचूकपणे आठवला नाही, तर दैवाला दोष देण्याखेरीच मार्ग नाही.









