अध्याय अकरावा
राजन्ब्रह्मापि त्रिविधमोंतत्सदिति भेदतऽ । त्रिलोकेषु त्रिधा भूतमखिलं भूप वर्तते ।। 26 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, या विश्वातल्या सर्व वस्तू त्रिगुणात्मक आहेत. अगदी ब्रह्मदेखील त्याला अपवाद नसून तीन प्रकारचे आहे. ब्रह्मलोक हा चौदा लोकांपैकी सर्वश्रेष्ठ मानला जातो. मनुष्य पुण्यकर्मे करत जरी तिथपर्यंत पोहोचला तरी त्याचा पुनर्जन्म चुकत नाही. पुनर्जन्म चुकवण्यासाठी वैकुंठप्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. ब्रह्मदेव व ब्रह्मलोकाचा समावेश ईश्वरनिर्मित विश्वात होतो. त्यामुळे ईश्वरनिर्मित इतर गोष्टीप्रमाणे ब्रह्म हेही तीन प्रकारचे आहे. ओम, तत, सत अशी ब्रह्माची तीन नावे श्रुतिनी सांगितली आहेत. ओंकाराचा उच्चार अत्यंत पवित्र आहे म्हणून त्याचा उच्चार करून केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करावीत म्हणजे माणसाच्या मनात मी कर्ता आहे असे मनात ठाण मांडून बसलेले विचार आणि त्यामुळे झालेला अहंकार व फलेच्छा नाहीशा होतात. ईश्वरानं दिलेलं कर्म, त्याच्या प्रेरणेनुसार करून त्यालाच अर्पण केलं की, आपण निर्लेप होतो व केलेलं कर्मही निर्दोष होतं. ईश्वराला तरी आणखीन काय हवंय? त्यालाही माणसानं निर्लेप होऊन गुणातीत व्हावं आणि त्याला येऊन मिळावं असंच वाटत असतं आणि त्यासाठीच कर्माच्या आरंभी ओंकाराचा उच्चार करावा आणि कर्म झाल्यावर पुन्हा ओंकाराचा उच्चार करून केलेलं कर्म जसं झालं असेल तसं ईश्वराला अर्पण करावं म्हणजे आपण त्या कर्माच्या बंधनातून मुक्त होतो.
ओम, तत, सत ही ब्रह्माची तीन नावे आहेत, त्यापैकी ओम नावाचं महात्म्य आपण समजावून घेतलं. आता तत का म्हणायचं ते पाहू. तत नावाचा उच्चार करून विशेषत: यज्ञ, तप, दान इत्यादि कर्मे निरपेक्षपणे ईश्वराला अर्पण केली जातात. काहीवेळा समाजाचे कल्याण व्हावे म्हणून फळाची इच्छा मनात धरून कर्मे केली जातात. उदाहरणार्थ प्रजेवर आलेलं दुष्काळाचं अरिष्ट व त्यामुळे प्रजेच्या होणाऱ्या हालअपेष्टा टाळण्यासाठी, पाऊस पडावा म्हणून किंवा साथीच्या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी काही अनुष्ठाने, व्रते, यज्ञ केले जातात. अशा कर्मातील दोष सत या नामाचा उच्चार केला की, दूर होतात व कर्म ब्रह्मस्वरूप किंवा ब्रह्मार्पण होते. जर कुणाला सद्भावनेने यज्ञ, तप, दान करायचे असेल तर ते सत या नामाचा उच्चार करून केले असता ब्रह्मार्पण होते. थोडक्यात ओम, तत, सत या नामांचा उच्चार करून, निरपेक्षतेने किंवा उदात्त हेतूने केलेले कर्म ब्रम्हार्पण होते.
भगवदगीतेच्या सतराव्या अध्यायात ह्याबद्दल सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, तत्-सत् ह्यापरी ब्रह्म तिहेरी स्मरले असे । त्यांतूनि निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक ।। 23 ।। म्हणूनि आधी ओंकार उच्चारूनि उपासक । यज्ञ-दान-तपे उक्त निरंतर अनुष्ठिती ।। 24 ।। तत्-कार-स्मरणे सर्व तोडूनि फल-वासना। नाना यज्ञ तपे दानेकरिती मोक्ष लक्षुनी ।। 25 ।। सत्-कार-स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता। तशी सुंदरता कर्मी सत्-कारे बोलिली असे ।। 26।। यज्ञ-दान-तपे किंवा कर्मे जी त्यांस साधक। वागणे ह्यापरी त्यांत सत्-कार-फळ बोलिले ।। 27 ।। भगवंताच्या सांगण्यानुसार ओम उच्चार केला असता मी कर्ता नाही असे होते. तत उच्चाराने केलेल्या क्रमातील फलवासना सोडून दिली अशी खात्री दिली जाते तर सत म्हंटल्यामुळे केलेले कर्म पवित्र आणि सुंदर होते. म्हणून ओम, तत, सत उच्चाराने जे केलेले यज्ञ, तप, दान ईश्वराला अर्पण करतात त्यांना मोक्ष मिळतो. ब्रम्हाचे तीन प्रकार सांगून झाल्यावर बाप्पा समाजाचे व्यवसायानुसार चार विभाग कसे होतात ते पुढील श्लोकात सांगत आहेत.
क्रमश:








