बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कर्ले येथे वनअधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वनखात्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अनेक दशकांपासून येथील शेतकरी सदर जमीन कसत आहेत. यावरच त्यांची उपजीविका चालवित आहेत. यासाठी प्रशासनाने वनधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतजमिनी वनखात्याची असल्याची अधिसूचना मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
गावातील 3/2, 4/2, 5/2, 7/2, 24/3, 30/2, 33/2, 34/2, 35/2, 36/2, 37/2, 39/10, 39/11. 43/2 आदी सर्व्हे क्रमांकातील जमिनी वनखात्याची असल्याची अधिसूचना वनधिकाऱ्यांकडून काढण्यात आली आहे. मात्र या जमिनी येथील शेतकरी अनेक वर्षांपासून कसून यावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. अचानकपणे या जमिनी वनखात्याकडून ताब्यात घेतल्यास शेतकऱ्यांसह कुटुंबीयांचा उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. यासाठी सदर अधिसूचना त्वरीत मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विनायक पाटील, रमेश मंडोळकर, पुंडलिक मोरे, सातेरी खेमनाळकर, शिवाजी पाटील, तानाजी सांबरेकर आदिंसह शेतकरी उपस्थित होते.









