‘द क्रू’ चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
रेहा कपूर आणि एकता कपूरने स्वतःच्या नव्या चित्रपटातील कलाकारांची घोषणा केली आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘द क्रू’ हा विनोदी धाटणीचा असून यात करिना कपूर, तब्बू आणि क्रीति सेनॉन एकत्र दिसून येणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिलजीत दोसांझची एंट्री झाली आहे. चित्रपटात दिलजीत तिन्ही अभिनेत्रींसोबत कॉमेडीचा डबल डोस प्रेक्षकांना मिळवून देणार आहे.

दिलजीत या चित्रपटात सामील झाल्याने आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. हा चित्रपट आमच्यासाठी विशेष प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाद्वारे आम्ही प्रेक्षकांना स्मरणीय अनुभव मिळवून देणार असल्याचे रेहा कपूरने म्हटले आहे.

स्वतःच्या आयुष्यामुळे त्रस्त आणि नवे काही तरी करू पाहणाऱया तीन महिलांवर या चित्रपटाची कहाणी बेतलेली आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित केला जाऊ शकतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश क्रिश्नन करत आहेत. तर याची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेड आणि अनिल कपूर प्रॉडक्शन्सकडून केली जात आहे. या चित्रपटाद्वारे करिना कपूर आणि क्रीति सेनॉन पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.









