वृत्तसंस्था / बेंगळूर
येथे सुरू असलेल्या एस.एम. कृष्णा स्मृती खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या करणसिंगने रशियाच्या लेनीनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे आर्यन शहाने शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे.
आयटीएफ विश्व टेनिस टूरवरील पुरुषांच्या या एम-25 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत एकेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित करणसिंगने रशियाच्या निकीता लेनीनचा 3-6, 6-3, 7-5 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. करणसिंग आणि जे क्लार्क यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. करणसिंग आणि लेनीन यांच्यातील हा सामना दोन तास चालला होता. अन्य एका सामन्यात टॉपसिडेड जे क्लार्कने कझाकस्थानच्या लोमाकिनचा 6-4, 6-3 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात भारताच्या सहाव्या मानांकित आर्यन शहाने आपल्याच देशाच्या एस. डी. प्रज्वल देवचा 6-3, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. आर्यन आणि क्रेफोर्ड यांच्यात पुढील फेरीतील सामना होईल. क्रेफोर्डने सिद्धार्थ रावतचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. चिराग दुहेनने अभिनव शणमुगमचा 4-6, 7-5, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.









