वृत्तसंस्था/ पुणे
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र खुल्या चॅलेंजर 100 दर्जाच्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत वाईल्डकार्डधारक करण सिंग आणि रामकुमार रामनाथन यांचे आव्हान समाप्त झाले.
प्रमुख ड्रॉमधील पहिल्या फेरीमध्ये करण सिंगला तर पात्र फेरीच्या शेवटच्या सामन्यात रामकुमार रामनाथनला पराभूत व्हावे लागले. पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमधील पहिल्या फेरीच्या सामन्यात कॅनडाच्या अॅलेक्सिस गॅलेरमेयुने करण सिंगचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये 65 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत पुढील फेरी गाठली. या लढतीमध्ये कॅनडाच्या गॅलेरमेयुने पहिल्या आणि दुसऱ्या सेटमधील पहिल्या गेममध्ये करण सिंगची सर्व्हिस भेदली.
गेल्या वर्षी या स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा मोनॅकोचा व्हॅलेंटिन व्हॅचेरॉटचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले. डेन्मार्कच्या मॉलेरने व्हॅचेरॉटचा 5-7, 6-2, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत साथ मिळविले. हा सामना 2 तास चालला होता. अन्य एका सामन्यात झेकच्या सिव्हेरसिनाने डेन्मार्कच्या होमग्रेनवर 6-4, 3-6, 7-5 अशी मात केली. दरम्यान पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉतील सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी झालेल्या पात्र फेरीतील अंतिम सामन्यात बेल्जियमच्या किमेर कोपेजेन्सने रामकुमार रामनाथनवर 6-4, 6-7 (5-7), 6-0 अशी मात केली. हा सामना 2 तास चालला होता.









