वार्ताहर /नंदगड
करंबळ येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा बुधवार दि. 28 पासून सुरू होणार आहे. गुरुवार दि. 7 मार्चपर्यंत नऊ दिवस होणाऱ्या या यात्रेसाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. करंबळ येथील लक्ष्मीदेवी गदगेच्या ठिकाणी भव्य शामियाना उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. करंबळ येथील लक्ष्मी यात्रेत करंबळसह जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या पाच गावांचा समावेश आहे. पाचही गावातील प्रत्येक घरात जत्रेच्या तयारीची कामे जोमाने सुरू आहेत. प्रत्येक घर रंगरंगोटीने सजले आहे. मित्रपरिवार पै पाहुण्यांना आंमत्रण देण्यासाठी पाचही गावातील लोक व्यस्त आहेत. यात्रेला अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्याने महिला वर्गही घरगुती कामात दंग आहेत. तसेच यात्रेला लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळवही सुरू आहे. यात्रा परिसरात लावण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या दुकानांच्या स्टॉलची आखणी लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली. यावेळी काही दुकानदार उपस्थित होते.
बालाजी मंदिराची प्रतिकृती
गदगेवर उभारण्यात येत असलेला शामियाना तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृतीप्रमाणे करण्यात येत आहे. त्या बाजूला भाविकांच्या विश्रांतीसाठी मंडप घालण्यात येत आहे.









