वाद्याच्या गजरात तरुणाईने धरला ठेका : देवीचे सीमेकडे प्रस्थान झाल्यानंतर समाप्ती
वार्ताहर /नंदगड
करंबळ येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवाचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. देवीला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. सायंकाळी 5 वाजता गदगी परिसरात मिरवणूक व सायंकाळी 7 वाजता मिरवणुकीनंतर देवीचे सीमेकडे प्रस्थान झाले. त्यानंतर यात्रोत्सवाची समाप्ती झाली. करंबळ लक्ष्मी यात्रेत करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल गावांचा समावेश आहे. बुधवार दि. 28 फेब्रुवारीपासून लक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरवात झाली होती. त्यानिमित्त देवीचा विवाह सोहळा, मिरवणूक, गदगेवर स्थापना, अन्य धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. गुरुवार दि. 7 रोजी हा यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या पाच गावातील अबालवृद्धासह पै-पाहुणे, माहेरवासिनी, व भाविक दुपारी 3 वाजल्यापासून यात्रास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी 5 वाजता देवीची पूजा, अर्चा व अन्य धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर देवीला गदगेवरून खाली आणण्यात आले. यात्रेसाठी गदगेवर घालण्यात आलेल्या मंडपाबाहेर लक्ष्मी देवीच्या मूर्तीला घेतले. त्यानंतर गदगी परिसरातील मंडपासभोवती पाच फेऱ्या काढल्या. त्यानंतर यात्रेच्या ठिकाणी असलेल्या खुल्या जागेत देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मातंगी झोपडी भोवती फेरे काढण्यात आले. अन्य धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर झोपडीला आग लावण्यात आली. पुढे मिरवणूक गावच्या पूर्वेला असलेल्या शेतवाडीत गेली. त्यानंतर पारंपरिक मार्गावरून देवीचे सीमेकडे प्रस्थान झाले. लक्ष्मी देवीच्या मूर्तीला लाकडी डोलाऱ्यावर बसवण्यात आले होते. त्या डोलाऱ्यावर दोन्ही बाजूने लांब बांबू बांधण्यात आले होते. बांबूच्या साहाय्याने 40 ते 50 युवक देवीच्या मूर्तीला खांद्यावर घेऊन नाचवत होते. मोठमोठे ढोल वाजवण्यात येत होते. वाद्याच्या गजरात तरुणाई नृत्य करत होती. देवीवर भंडारा उधळला जात होता. देवीचा सर्वत्र जयघोष करण्यात येत होता. देवीची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 18 वर्षानंतर भरलेल्या लक्ष्मीदेवी यात्रेला पै, पाहुणे, माहेरवासिनी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने दाखल झाले होते. करंबळ गावात लक्ष्मी यात्रा होत असल्याने खानापूर शहरातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सांगता मिरवणूक पाहण्यासाठी दाखल झाले होते.









