कौंदल येथील रहिवासी : देसूरजवळील पुलावर अपघात
खानापूर : बेळगाव-खानापूर रस्त्यावर देसूर जवळील पुलावर अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने कौंदल (ता. खानापूर) येथील उदय नारायण भोसले (वय 42) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले प्रशांत पाटील हे जखमी झाले आहेत. सदर अपघात हा सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता झाला असून अज्ञात वाहनाने ठोकर देऊन पलायन केल्याचा गुन्हा वडगाव पोलीस स्थानकात नोंद झाला आहे. खानापूर तालुक्यातील कौंदल येथील उदय नारायण भोसले हे काही कामानिमित्त करंबळ येथील प्रशांत पाटील या आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरून बेळगावला गेले होते. काम आटोपून पुन्हा खानापूरकडे येताना देसूरजवळील पुलावर मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या मागे बसलेले प्रशांत पाटील हे जखमी झाले
आहेत.त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वाहनाने धडक दिल्यानंतर तेथून पलायन केले आहे. मात्र अपघाताच्या ठिकाणी एका चारचाकी वाहनाची नंबर प्लेट पडली असून याच वाहनाने धडक दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने वडगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उदय भोसले हे करंबळ ग्राम पंचायतचे सदस्य असून ते भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा विवाहित बहिणी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अपघाताची माहिती समजताच खानापूरहून आमदार विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी तर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, सुरेश जाधव यांच्यासह खानापूर परिसरातील भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आपघातस्थळी उपस्थित होते. वडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी दाखल झाल्यानंतर मृतदेह बेळगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला.









