कराड / प्रतिनिधी :
कराड शहरालगत असलेल्या शिंदे मळा येथील डॉक्टरांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकणार्या सहा ते सात दरोडेखोरांपैकी एकाला पोलिसांनी अंबरनाथ येथे सापळा रचून पकडले. दरम्यान, आणखी एकाला ताब्यात घेतल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले असून इतर दरोडेखोरांचा शोध सुरुच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुलदीपसिंग असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर ताब्यात घेतलेल्या आणखी एकाचे नाव समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिंदे मळा येथे डॉ. राजेश शिंदे व त्यांच्या पत्नी पुजा शिंदे या इतर डॉक्टर व कर्मचारी स्टाफच्या मदतीने होलीस्टींग हिलिंग सेंटर चालवतात. हॉस्पिटलच्या पाठीमागेच त्यांचा बंगला आहे. या बंगल्यावर सोमवार दि. 10 रोजी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुरा व चाकूचा धाक दाखवत 27 लाखांची रोकड व 48 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 46 लाख 20 हजारांच्या ऐवजा चोरून नेला होता. दरोडेखोरांनी कारमधून कराड शहरातून पाटण मार्गे कोकनातून मुंबईकडे पलायन केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी पाच पथके तयार करून दरोडेखोरांच्या तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका दरोडेखोराला ताब्यात घेऊन अटक केली. तर आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. कुलदीपसिंग असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. दरम्यान, इतर दरोडेखारांचा तपास सुरुच असून तेही लवकरच सापडतील असे पोलिसांनी सांगितले.