कराड :
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 सालच्या स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गुरूवारी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कराड पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय मंत्री मनोहर लाल, शहरी कार्य राज्यमंत्री तोखन साहू व शहर कार्य मंत्रालय सचिव श्रीनिवास कटिकिथला यांचीही उपस्थिती होती.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश या पाच राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यातील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये कराड पालिकेने द्वितीय क्रमांक मिळवला. यापूर्वी 2019 व 20 अशी दोन वर्षे कराडने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. सलग सहा वर्षे कराड पालिकेने या स्पर्धेत सातत्य राखत यश मिळवले आहे.
दिल्ली येथे गुरूवारी झालेल्या या पुरस्कार वितरणप्रसंगी पालिकेचे शहर समन्वयक आशिष रोकडे, विभाग प्रमुख संदीप रणदिवे, मुकादम किरण कांबळे, शेखर लाड, फैय्याज बारगिर, अशोक डाईंगडे, संजय तावरे, स्वप्नील सरगडे यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल कराडकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे..








