कराड :
प्रदीर्घ विश्रांतीनंर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार पावसाने कराड शहर व परिसराला झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले होते. तर विद्यानगरहून शहरात येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा पुलानजीक मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
राज्यासह देशातील काही भागात ढगफुटीसदृश्य पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना सातारा जिल्हयाला मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा चांगलाच अनुभव आला आहे. मे व जून महिन्याच्या सुरवातीला दमदार पावसाने शेतीचे कामे खोळंबली यानंतर पावसाने दडी मारल्याने अपवाद वगळता संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. ऑगस्ट महिन्याचाही पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कराड शहरासह आसपासच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली जवळपास तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. दोन तास जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला, मात्र रिमझिम पाऊस सायंकाळीही सुरू होता.
विद्यानगरहून शहरात येणाऱ्या रस्यावर कृष्णा पुलानजीक मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पाण्यामुळे अत्यंत धिम्या गतीने वाहतूक सुरू असल्याने कृष्णा कॅनॉलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे शहरातून विद्यानरकडे जाणारी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने दोन्ही कृष्णा पुलावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी सहकाऱ्यांसोबत कृष्णा कॅनॉल येथे पोहोचले. यावेळी दोन्ही पुलासह मसूर व ओगलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात आली.








