पुलावरून ये–जा करणाऱ्या महिला, मुलींकडे पाहून ते टिंगलटवाळी करत असतात
कराड : कराड–विटा मार्गावरील कराडचा नवा कृष्णा पूल अंधारात असून पुलावरील 35 खांबांवरील 150 वॅटचे 70 एलईडी बल्ब गेले कित्येक दिवस बंद आहेत. कृष्णा पुलावरील दोन्ही बाजूच्या फुटपाथवर सकाळी, सायंकाळी व रात्री जेवणानंतर अनेक नागरिक फिरायला येतात. मात्र सध्या पुलावरील अंधाराचा फायदा घेत अनेक महिला, मुलींची जाणीवपूर्वक छेडछाड किंवा टिंगलटवाळी केली जात असल्याच्या घटना घडत आहेत.
बदनामीच्या भीतीने कोणी तक्रार द्यायला पुढे येत नसल्याची चर्चा आहे. यासंदर्भात प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पुलावरील 35 खांबांवरील एलईडी लाईट सुरू कराव्यात, अशी मागणी वाढत आहे. मात्र याकडे ठेकेदाराचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कराडकरांनी केला असून यासंदर्भात आमदार डॉ. अतुल भोसले यांनी स्वत: लक्ष घालून कराडातील महत्त्वाच्या कृष्णा पुलावरील अंधार दूर करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.
कृष्णा पूल हा गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील
शहरातील महत्त्वाचा पूल आहे. पुलांच्या दोन्ही बाजूला फुटपाथ आहे. सायंकाळी नदी परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि गार वाऱ्याचा वेग हे वातावरण अनुभवण्यासाठी शेकडो कराडकर सहकुटुंब पुलाच्या फुटपाथवर पायी चालण्यासाठी येतात. सकाळी अनेक लोक, महिला चालण्याच्या व्यायामासाठी पुलावर असतात. अलीकडे पुलाच्या खांबांवरील वीज गायब असल्याने अनेक युवक किंवा सराईत गुन्हेगार दारूच्या बाटल्यांसह फुटपाथवर बिनधास्त उभे असतात.
पुलावरून ये–जा करणाऱ्या महिला, मुलींकडे पाहून ते टिंगलटवाळी करत असतात. पुलावरील खांबांवर जेव्हा लाईट असते, तेव्हा असे प्रकार शक्यतो घडत नाहीत. कारण येणाऱ्या–जाणाऱ्या वाहनधारकांसह पोलिसांच्याही सहज असे संशयित नजरेस पडतात. मात्र पुलावर अंधार असल्याने टिंगलटवाळीचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे कृष्णा पुलावरील खांबांवर लाईट असणे गरजेचे आहे. एखादी दुर्घटना घडण्याअगोदर प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देवून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे.








