नवारस्ता :
मुसळधार पावसामुळे सोमवारपासून कराड-चिपळूण महामार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव, शिरळ येथे सुरू असलेले महामार्गाचे काम अखेर सुमारे 36 तासांनंतर बुधवारी पूर्ण झाले. मात्र पावसामुळे रस्त्यात अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे 25 ते 30 टनापर्यंत वजनाची वाहनेच सध्या या मार्गावरून जाऊ शकतात. अतिअवजड वाहनांसाठी अजूनही चार दिवसांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता महेश पाटील यांनी दिली.
पाटण तालुक्यात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे कोयना विभागातील वाजेगाव येथील वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. परिणामी कराड-चिपळूण महामार्गावर पाणी वाहू लागले. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सोमवारपासून महामार्ग प्रशासनाने भर पावसात तब्बल तास युद्धपातळीवर काम करून महामार्गावरील वाजेगाव येथील पूल बुधवारी वाहतुकीस सुरळीत केला. मात्र पावसामुळे रस्त्यात अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे 25 ते 30 टनापर्यंत वजनाची वाहनेच सध्या या मार्गावरून जाऊ शकतात. अतिअवजड वाहनांसाठी अजूनही चार दिवसांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता महेश पाटील यांनी दिली.
- तीन दिवसांपासून अडकलेली अवजड वाहने निघाली
वाजेगाव येथील वळण पूल वाहून गेल्यामुळे वाजेगाव येथे महामार्गावर अनेक अवजड वाहने अडकून पडली होती. मात्र बुधवारी वाजेगाव, शिरळ पूल पूर्णत्वास आल्यानंतर तीन दिवसांपासून अडकलेली अवजड वाहने प्रशासनाने सुरक्षितपणे निघाली असल्याची माहिती महामार्ग प्रशासनाने दिली.
- अतिअवजड वाहनांना अद्याप बंदी
कोयना परिसरात पावसाचा जोर कायम असून नवीन वाजेगाव पूल आणि तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांना पावसामुळे अद्यापही मजबुती मिळत नाही. त्यामुळे सध्यातरी या मार्गावरून 25 ते 30 टन वजनाची वाहने जाऊ शकतात. अतिवजनाची वाहने गेल्यास नवीन रस्त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे किमान चार दिवस तरी हा रस्ता मजबूत होण्यासाठी अतिवजनाच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कराड आणि चिपळूणकडून येणारी अतिवजनाची वाहने पुढे पाठवू नये, अशी मागणी ही महामार्ग प्रशासनाने केली आहे.
- महामार्गाच्या उर्वरित कामांना गती द्यावी-पालकमंत्री
कराड चिपळूण महामार्गावरील वाजेगाव, शिरळ येथील कामे प्रशासनाने तातडीने पूर्ण करून महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत करावा तसेच महामार्गाच्या पुढील उर्वरित कामासही गती द्यावी, अशा सूचना राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.








