तलावातील जुने पाणी उपसा करण्यासह रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करणार
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून कपिलेश्वर येथील जुना आणि नवीन कपिलेश्वर तलावाच्या स्वच्छतेच्या कामाला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्या हस्ते बुधवारी रात्री पूजन करून चालना देण्यात आली. त्यामुळे तलावातील जुने पाणी उपसा करण्यासह रंगरंगोटी व विद्युत रोषणाई केली जाणार आहे. गणेशोत्सव केवळ 20 दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महापालिकेकडून आवश्यक कामे हाती घेण्यात यावीत, यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी एलअॅण्डटीकडून शहर व उपनगरात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात याचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने चरी बुजवाव्यात, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक श्री मूर्तीचे कपिलेश्वर तलावात विसर्जन केले जाते. त्यामुळे जुने आणि नवीन तलावांची स्वच्छता करून ते विसर्जनासाठी सज्ज ठेवावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार बुधवारी रात्री महापौर, उपमहापौर, नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करून कामाला चालना दिली. त्यामुळे गणेश भक्तांतून समाधान व्यक्त होत आहे.









