प्रतिनिधी, सरवडे
पर्यावरण संरक्षणासाठी वधूवरांनी आधी झाडे लावल्याचा फोटो आणावा, मगच लग्न नोंद करुन प्रमाणपत्र दिले जाईल, असा निर्णय राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर ग्रामपंचायतीने घेतला आहे. पर्यावरण वाढीच्या दृष्टीने घेतलेला हा जिह्यातील नवोपक्रम ठरला असून याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
बदलत्या हवामानामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. झाडे जगली तरच पर्यावरण वाचेल आणि ते मानवाला उपयुक्त ठरेल, यासाठी कपिलेश्वर ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक नागरिकाला दोन झाडे वाटप करून ती जतन, संवर्धनासाठी प्रेरित केले आहे. ग्रामसभेत वधूवरांनी झाडे लावून त्यांचे फोटो ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन यावेत. असे फोटो येईपर्यंत विवाह नोंदणी केली जाणार नाही, नोंदणी प्रमाणपत्र मिळणार नाही, असा पर्यावरण पूरक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. हा संदेश सोशल व्हायरल झाल्यामुळे तालुक्यासह जिल्हाभर या आगळ्यावेगळ्या पर्यावरण संरक्षण निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
ग्रामसभेस सरपंच शहाजी पाटील ,उपसरपंच रामचंद्र आळवणे, पोलीस पाटील मानसिंग काटकर, सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, विविध पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.









