खडी उखडल्याने अपघातांची मालिका
बेळगाव : शहरातील कपिलेश्वर उड्डाण पुलावरील डांबरीकरण उखडून निघाले आहे. यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहने चालविणे अवघड झाले आहे. दररोज शेकडो वाहनचालक या उड्डाण पुलावरून ये-जा करत असल्याने अनेक अपघात होत आहेत. तरीदेखील डांबरीकरण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड-शो वेळी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. यापूर्वीच्या पावसाळ्यात उड्डाण पुलावरून पाणी जाण्यास जागा उपलब्ध नसल्याने खडी अनेक ठिकाणी साचली होती. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर पावसाळ्यात ही खडी बाजूला करण्यात आली खरी. परंतु आता मात्र अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात हा उड्डाण पूल असल्याने मोठ्या वाहनांपेक्षा दुचाकी, चार चाकी वाहनांची ये-जा सतत सुरू असते.या उड्डाण पुलावरून दुचाकी वाहने घसरून अनेकवेळा अपघात होत आहेत.
रात्रीच्या वेळी खड्डे निदर्शनास न आल्याने अपघात होण्याची संख्या वाढली आहे. अनेकवेळा मागणी करूनदेखील अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. ज्या भागात क्वचित एखादे वाहन जाते अशा रस्त्याचे दर दोन-चार वर्षांनी राजकीय आशीर्वादाने डांबरीकरण होते. परंतु शहरातील मुख्य रस्त्यांना खड्डे पडले तरी लक्ष पुरविण्यास कोणालाच वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.









