चिखलामुळे वाहने घसरून अपघात : चिखल दूर न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कपिलेश्वर कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलामुळे वाहने घसरून अपघात होत असल्यामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावरच चिखल पसरला असल्याने नागरिकांनी ये-जा कुठून करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा चिखल दूर न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. भातकांडे स्कूलपासून जुना धारवाडरोडपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ड्रेनेज वाहिन्या व इतर वाहिन्या घालण्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे सर्वत्र मातीचे ढिगारे पसरले आहेत. मागील आठ दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात जोर घेतल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले. शहापूरमधून जुना धारवाड रोडला जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे दिवसभरातील शेकडो वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची ये-जा असते. दुचाकी, चारचाकी वाहने चिखलातून ये-जा करीत असल्याने सर्वत्र ख•s पडले आहेत. रात्रीच्यावेळी तर चिखलाचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असे प्रकार होत असताना महानगरपालिका व लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प आहेत. एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल स्थानिक उपस्थित करीत आहेत.
दुऊस्ती करण्याची मागणी
शाळेची मुले या रस्त्यावरून सायकल घेऊन ये-जा करत असतात. येथे सायकल घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शाळेला जाणारे विद्यार्थी चिखलामध्ये पडत असल्याने त्याचे कपडे खराब होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. रस्त्याची तात्पुरती स्वरुपात का होईना परंतु दुरुस्ती न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्णय येथील रहिवाशांनी घेतला आहे.









