टाळ-मृदंगाचा गजर : भजनी मंडळांचा प्रतिसाद : उद्या विजेत्या संघांना बक्षिसे देऊन गौरविणार
प्रतिनिधी /बेळगाव
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रॉडक्शन आयोजित सोमवारी 9 भजनी मंडळांनी भजने सादर करून भजन स्पर्धेत रंगत आणली. आतापर्यंत 25 संघांनी भजन स्पर्धेत सहभाग दर्शविला आहे. मंगळवारी 13 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बुधवारी विजेत्या संघांना बक्षिसे देऊन गौरव केला जाणार आहे.
सोमवारी टिळकवाडी येथील शारदा भजनी मंडळ, बेळगुंदी येथील गणेश स्वरधारा भजन मंडळ, माणगाव येथील संत तुकाराम भजनी मंडळ, बेन्नाळी येथील संत चोखामेळा भजनी मंडळ, संभाजी गल्ली, खासबाग येथील क्रांती महिला भजनी मंडळ, जांबोटी येथील नवयुवक भजनी मंडळ, किणये येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, मच्छे येथील श्री हरिओम महिला भजनी मंडळ, वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, व्हन्नाळी, ता. कागल येथील श्री माउली भजनी मंडळ यांनी एकापेक्षा एक सुंदर भजने सादर करून वाहवा मिळविली. कपिलेश्वर परिसरात या स्पर्धेमुळे टाळ-मृदंगांचा गजर सुरू झाला आहे. शिवाय महिला भजनी मंडळांचा प्रतिसाद वाढला आहे. स्वर, ताल, लय आणि टाळ-मृदंगांचे एकत्रिकरण पाहायला मिळाले.
आज 13 भजनी मंडळांचे सादरीकरण
मंगळवारी या स्पर्धेत 13 भजनी मंडळे भजने सादर करणार आहेत. हनुमाननगर येथील श्री ओमकार भजनी मंडळ, हंदिगनूर येथील श्री तळेश्वर भजनी मंडळ, कुदेमनी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ, गोल्याळी येथील श्री रवळनाथ भजनी मंडळ, बेळगुंदी येथील श्री बालगोपाळ भजनी मंडळ, कल्लेहोळ येथील श्री हरिसंगीत कला मंच, दारोळी, ता. खानापूर येथील श्री शिव गणेश भजनी मंडळ, कार्वे, ता. चंदगड येथील श्री देव कलमेश्वर भजनी मंडळ, बाकनूर येथील श्री धन्य ते माता-पिता भजनी मंडळ, तुरुंबे, ता. राधानगरी येथील श्री माउली भजनी मंडळ, पेठ वडगाव (कोल्हापूर) येथील श्री माउली भजनी मंडळ, तांबोळी, ता. सावंतवाडी येथील श्री स्वरधारा प्रासादिक भजनी मंडळ, वारणा (कोल्हापूर) येथील श्री राधा गोविंद भजनी मंडळ भजन सादर करणार आहेत.









