सलमानसोबत काम करणाऱ्यास मारण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ अमृतसर
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर लॉरेन्स गँगने त्याला पुन्हा धमकी दिली आहे. लॉरेन्स गँगमधील हॅरी बॉक्सरच्या नावाने एक ऑडिओ समोर आला असून त्यामध्ये कपिल शर्मा तसेच संपूर्ण चित्रपट उद्योगाला इशारा देण्यात आला आहे. जो सलमान खानसोबत काम करेल त्याला मारले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्या हॅरी बॉक्सरचे खरे नाव हरिचंद उर्फ हॅरी बॉक्सर आहे. त्याच्या वडिलांचे नाव गिरधारी जाट आहे. तो राजस्थानमधील अलवर जिह्यातील चित्रपुरा गावचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध भारतात अनेक एफआयआर दाखल आहेत. 2024 मध्ये हॅरीने बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला होता. सध्या तो अमेरिकेत सक्रिय असून तेथील लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. तो गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या खूप जवळचा आहे गोल्डी ब्रार लॉरेन्स गँगपासून दूर झाल्यानंतर, आता लॉरेन्स बिश्नोई टोळीने अमेरिकेत हॅरी बॉक्सरला सेट केले आहे. लॉरेन्स अँड कंपनी गँगचे सर्व खंडणीचे काम हॅरी बॉक्सर पाहत आहे.









