गेल्या शंभर वर्षात पर्यावरणाचा सर्वात घातक शत्रू कोण असेल? तर ते पॉलिथिन प्लास्टीक आहे, असे सांगितले जाते. पॉलिथिन किंवा प्लास्टीक या पदार्थाचे नैसर्गिक विघटन त्वरित होत नाही. ते होण्यासाठी हजारो वर्षे लागू शकतात. त्यामुळे प्लास्टीकचा उपयोग वाढल्यास तो हवा, पाणी आणि भूमी या तिघांसाठीही धोका असतो. प्लास्टीकमुळे होणाऱया पर्यावरणाच्या हानीबद्दल आजवर बरेच लिहिले गेले आहे. तथापि, त्याचा उपयोग अनिवार्यपणे करावा लागतो. तथापि, उपयोग करून झालेल्या प्लास्टीकचे काय करायचे? हा प्रश्न असतो.

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कानपूर येथे काही तंत्रज्ञांनी एकत्र येऊन प्रयोग सुरू केले आहेत. कानपूर प्लागर्स या नावाने त्यांची संस्था ओळखली जाते. उपयोग केल्यानंतर फेकून दिलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या किंवा इतर वस्तू एकत्र करून त्याचे रिसायकलिंग करून त्यापासून कायमस्वरुपी वस्तू कशा बनविता येतील? यावर हे संशोधक प्रयोग करीत आहेत. त्यांनी या प्लास्टीकपासून वृक्षसंरक्षकाची (ट्रि गार्ड) निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. झाडे पर्यावरणाचे संरक्षण करतात तर प्लास्टीक पर्यावरणाला हानी पोहोचविते. अशा स्थितीत या हानीकारक द्रव्यापासून पर्यावरण संरक्षक झाडालाच त्याच्या प्राथमिक अवस्थेत संरक्षण देण्याची किमया या संशोधकांनी करून दाखविली आहे. याचाच अर्थ असा की पर्यावरणासाठी हानीकारक असणाऱया पदार्थाचेच त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी शस्त्रात रूपांतर केले आहे. त्यांनी तयार केलेली हजाराहून अधिक ट्रि गार्ड आज अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या रोपटय़ांचे संरक्षण करीत आहेत.









