पेंडालवरून कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी
बेळगाव : मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी प्रशासनाला कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडून यंदा राज्योत्सव साजरा करावा लागला. या राज्योत्सवासाठी अनेकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील व्यापाऱ्यांकडून जबरदस्ती करत देणगी गोळा करून राज्योत्सव साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे बेळगाव व सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या राज्योत्सवातून नेमके काय साध्य करण्यात आले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बेळगाव आपले आहे, हे दाखविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारचा खटाटोप सुरू आहे. स्थानिक कन्नड लोकांनी पाठ फिरविल्यामुळे परजिल्ह्यांतून लोकांना आणून बेळगावमध्ये राज्योत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी मुठभर कन्नड संघटनांना पैशाचे आमिष दाखवून राज्योत्सव साजरा करण्यात आला.
कन्नड संघटनांमध्ये एकी नसल्याने प्रत्येक जण मी नेता, तू नेता या अविर्भावात वागत होता. चन्नम्मा चौकात जाहिरात फलक लावण्यावरून कन्नड संघटनांच्या नेत्यांमध्येच वादावादीच्या घटनाही घडल्या. तसेच संघटनेचे वर्चस्व दाखविण्यासाठी चन्नम्मा चौक ते काकतीवेसपर्यंत पेंडाल घालण्यात आले होते. पेंडाल घालतानाही राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. शेवटी पेंडाल घालण्याचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. अखेर मनपा अधिकाऱ्यांना सांगून मध्यस्थीने पेंडाल घालून कार्यकर्त्यांचा रोष शमविला. केवळ मराठी भाषिकांना डिवचण्याच्या उद्देशाने सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा चुराडा केल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. जिल्ह्यासह राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष न देता सरकार अशा उत्सवांसाठी पैसा वाया घालत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली. कर्कश डीजेच्या आवाजावर बिभत्स नाचत धिंगाणा घालण्यात आला. एरव्ही उत्सवकाळासह मराठी नागरिकांच्या कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे कारण पुढे करत डीजेवर निर्बंध घातले जातात. राज्योत्सवादरम्यान मात्र अशा कोणत्याच नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.









