प्रवेशद्वारावरच अडविल्याने कार्यकर्त्यांचा हायड्रामा : प्रवेशद्वारासमोर ठिय्या, पोलिसांकडून अटक
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यादरम्यान महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने कन्नड संघटनांची वळवळ सुरू झाली आहे. महापौर आणि उपमहापौरांवर कारवाई करण्यासह मनपा बरखास्त करावी, या मागणीसाठी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला सोमवार दि. 13 रोजी पुन्हा घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडविल्याने कार्यकर्त्यांनी हायड्रामा केला. त्यानंतर पोलिसांनी कन्नडिगांना ताब्यात घेतले.
अनगोळ येथे नुकत्याच पार पडलेल्या धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून जोरदार वादंग सुरू आहे. त्यातच आता कन्नड संघटनांनीही हस्तक्षेप केला आहे. लोकार्पण सोहळ्यावेळी जय महाराष्ट्र म्हटल्याने कन्नडिगांनी गेल्या आठ दिवसांपासून थयथयाट करण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वी एका कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. चन्नम्मा चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे मोर्चा आल्यानंतर स्मार्ट सिटीच्यावतीने बसविण्यात आलेल्या पथदीपांची तोडफोड करण्यात आली होती. महापालिकेत कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घुसतील, या शक्यतेने पोलिसांनी प्रवेशद्वारावरच बॅरिकेड्स लावले होते. पण अतिउत्साही कन्नडिगांनी संरक्षण भिंतीवरून उडी घेत मनपात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
सोमवारीही कन्नडिगांकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच समजली होती. त्यामुळे सकाळपासूनच मनपा कार्यालय आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कन्नडीग त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. पण कन्नडिगांनी त्याठिकाणी ठिय्या केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.









