इंग्रजी-मराठी भाषेतील फलक हटविले
बेळगाव : राज्य सरकारच्या सूचनेनुसार महानगरपालिकेतील इंग्रजी व मराठी भाषांतील सर्व नामफलक हटवून केवळ कानडी भाषेत नामफलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी महानगरपालिकेत सर्वत्र कानडीकरण झाल्याचे पहावयास मिळाले. विविध विभागाबाहेर कन्नड नामफलक निदर्शनास आले. शिवाय लोकप्रतिनिधी, सत्ताधारी व विरोधी गटाच्या गटनेत्यांच्या कक्षाबाहेरील नामफलकांवरील इंग्रजी आणि मराठी अक्षरे हटवून केवळ कानडी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत. यापूर्वी शहर व उपनगरातील आस्थापना बाहेरील नामफलकांवर 60 टक्के कानडी भाषेत नाव लिहिण्यात यावे तर उर्वरित 40 टक्के भागात इंग्रजी किंवा अन्य भाषेतील नावे लिहिण्यात यावीत, असा फतवा काढण्यात आला होता.
त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील फलक पोलीस बंदोबस्तात हटविले. यानंतर आता पुन्हा कन्नडसक्ती तीव्र करण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व भाषिकांना त्यांच्या भाषेत समजावे यासाठी महानगरपालिकेत सर्व कक्षांबाहेर कानडी, इंग्रजी व मराठी भाषेत फलक लावण्यात आले होते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांच्या कक्षाबाहेरही कानडीसह इंग्रजी, मराठी भाषेतील फलक होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी सरकारच्या सचिव शालिनी रजनीश यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कानडी सक्ती करण्यात यावी, दैनंदिन कामकाजात, त्याचबरोबर पत्रव्यवहारात कन्नडला प्राधान्य द्यावे, असा आदेश जारी केला आहे. आदेशाची प्रत मिळताच मनपा आयुक्तांनी सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी इंग्रजी किंवा मराठी भाषेतील फलक होते ते सर्व हटवून केवळ कन्नड भाषेतील फलक लावण्यात आले आहेत.









