म. ए. युवा समिती सीमाभागतर्फे महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : कर्नाटकात कन्नड भाषेची सक्ती केली जात असली तरी सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असल्याने सीमाभागाला हा आदेश लागू होत नाही. बेळगावसह 865 खेडी मराठी भाषिक असून कन्नड भाषेची सक्ती करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. सीमावासियांना माणूस या नात्याने त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी मराठी भाषिक या नात्याने मराठीसाठी पुढाकार घ्यावा आणि कन्नडसक्ती थांबवावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी म. ए. युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने महापौर मंगेश पवार यांना देण्यात आले.
गत आठवड्यात कन्नड प्राधिकरणाची बैठक महापालिकेत पार पडली. सदर बैठकीत इंग्रजी व मराठी भाषेतील फलक हटवून केवळ कन्नड भाषेतील फलक बसविण्यात यावेत, शासकीय कामकाजात कन्नडलाच प्राधान्य द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र बेळगावसह 865 खेडी ही मराठी बहुलभाषिक आहेत. मराठी बहुलभाषिक भागात कन्नडची सक्ती करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. त्याचबरोबर संविधानाच्या कलम 19 आणि 29 ची पायमल्ली केली जात आहे.
2004 पासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असून तेथील निर्णयाचा आम्ही सर्वजण सन्मान करतो. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिक बहुसंख्य असल्याने बेळगाव महापालिकेचे महापौर म्हणून आपण हा निर्णय त्वरित मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत. भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे उपसचिव बेळगावात आले होते. त्यावेळी त्यांना मराठी भाषेसंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यांनी महापालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्या होत्या. मात्र त्यांच्या सूचनेचाही अवमान केला जात आहे. कन्नडसक्तीच्या माध्यमातून मराठी भाषेला डावलल्यास मराठी भाषिक म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल. त्यामुळे आपण कन्नडसक्ती मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
महापौरांच्या सरकारी वाहनांवरील मराठी फलक आणि नंबरप्लेट काढण्यात आले. एचएसआरपी नंबरप्लेट घालण्याऐवजी कन्नड अक्षरातील नंबर देण्यात आले आहेत. केवळ बेळगावातच कन्नडसक्ती का? त्यामुळे तुम्ही वैयक्तिक मराठी म्हणून मराठीसाठी संघर्ष करा, राजकारण निवडणुकीपुरता करावे. मराठीसाठी सर्वांनी एकत्र लढा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर महापौर मंगेश पवार यांनी कायद्याच्या चौकटीत काय करता येईल का, यासाठी नक्की प्रयत्न केले जातील. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, महादेव पाटील, प्रकाश शिरोळकर, मोतेश बार्देस्कर, भागोजीराव पाटील, रमेश माळवी, माजी महापौर महेश नाईक यांच्यासह समिती कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









