तालुका म. ए. समिती बैठक : हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : कन्नडसक्ती दूर व्हावी यासाठी मराठी भाषिकांनी नऊ हुतात्मे दिले आहेत. परंतु कन्नडसक्ती कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लढा दिल्याशिवाय कन्नडसक्ती दूर होणार नाही. त्यामुळे एकजुटीने पुन्हा लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. 1 जून रोजी हिंडलगा येथे होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला एकत्र येऊन सीमाप्रश्नाला बळ द्यावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले. मंगळवारी मराठा मंदिर येथे तालुका म. ए. समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. 1 जून रोजी सकाळी 8.30 वा.हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. यावेळी सीमालढ्याची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने तालुक्यातील मराठी भाषिकांनी अभिवादनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
1986 साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कन्नडसक्ती विरोधी आंदोलन करण्यात आले. त्यांना कन्नड पोलिसांनी अटक करून मारहाण केली. या घटनेच्याविरोधात सीमाभागात ठिकठिकाणी आंदोलने झाली. यावेळी बेळगाव शहरासह तालुक्यातील 9 जणांना हौतात्म्य आले. त्यामुळे त्यांचे बलिदान वाया जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रात जाईपर्यंत सीमालढा सुरूच राहील, असे विचार मनोहर किणेकर यांनी मांडले. आर. एम. चौगुले म्हणाले, लढ्यामध्ये तरुणांची संख्या वाढली पाहिजे. महाराष्ट्रातील नेते जर सीमाप्रश्नामध्ये सहभागी झाले तर युवकांची संख्या वाढण्यास मदत होईल. रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, मनोहर संताजी यांनी मार्गदर्शन केले. सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी हुतात्मा स्मृतिभवनाच्या बांधकामाविषयी माहिती देत तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर बांधकाम केले जाईल, असे सांगितले.
सीमासमन्वय मंत्र्यांवरून कार्यकर्त्यांची नाराजी
सीमावासियांचे प्रश्न तात्काळ सोडविता यावेत यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सीमासमन्वय मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांची नेमणूक झाल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु या मंत्र्यांनी सीमावासियांची साधी विचारपूसही केलेली नाही किंवा सीमाप्रश्नाला बळ देण्यासाठी ठोस उपाययोजना आखलेल्या नाहीत. यावरून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र सरकारपर्यंत नाराजीचा सूर पोहोचवावा, अशी मागणी म. ए. समितीच्या नेतृत्वाकडे केली.









