उमदी / महादेव कांबळे :
जत तालुक्याच्या पूर्व भागातील सीमावर्ती गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. या शाळांना शासनाने कन्नड माध्यमाची मान्यता दिलेली असताना, त्याठिकाणी नियुक्त केले गेलेले शिक्षक मात्र मराठी भाषिक आहेत. त्यामुळे कन्नड मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना अडथळे येत आहेत. त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शाळा कन्नड माध्यमाची असावी हे स्थानिक भाषिक गरजांनुसार योग्य आहे. मात्र, शिक्षक जर त्या भाषेतील नसतील तर शिक्षण प्रक्रियेचा प्रभावच हरवतो. शिक्षक शिकवतात, पण विद्यार्थ्यांना भाषा समजत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नाही आणि त्यांचे मूलभूत शैक्षणिक हक्क डावलले जातात. यामुळे पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी प्रशासनावर अनास्थेचा आरोप केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जत तालुक्यातील सीमाभागातील शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीचा मुद्दा वादाचा विषय राहिला आहे. माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील विधानसभेत हा विषय उपस्थित केला. सीमाभागातील कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षक नेमले जात असल्याच्या विरोधात आवाज उठवला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी जत तालुक्यात पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी अशा शाळांना भेटी देऊन वास्तव जाणून घेत महाराष्ट्र शासनाला कळवले होते. मात्र इतक्या वर्षांनंतरही या प्रश्नावर ठोस उपाय न झाल्यामुळे ही समस्या अधिक क्लिष्ट झाली आहे.
शिक्षण विभाग या प्रकरणावर गप्प आहे. शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करून ‘शाळेत चला, शिक्षण घ्या’ असे अभियान राबवते. पण शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्गखोल्या अशा सुविधांचा अभाव असताना, आता भाषेचा अडथळाही समोर उभा राहिला आहे. अशा दुहेरी संकटात सीमाभागातील विद्यार्थी सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर काही पालकांनी जर शासन आमच्या मुलांना त्यांच्या भाषेत शिक्षण देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात प्रवेश घेऊ असा इशारा दिला आहे. पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची मागणी आम्ही आधी केली होती. आता आमच्या मुलांच्या शिक्षणासाठीही तीच मागणी करावी लागेल का? असा सवाल बोर्गी येथील सिद्ध पाटील यांनी उपस्थित केला.
शिक्षण ही केवळ शाळेत शिकवण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या भाषिक, सामाजिक व भावनिक विकासाशी निगडीत आहे. शासनाने या प्रश्नाकडे लक्ष देत कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये कन्नड भाषिक शिक्षक नेमूनच ही समस्या सुटू शकते. यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया, सीमाभागाला विशेष धोरण, स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
- आ. पडळकर मार्ग काढतील
या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, जतचे आमदार गोपीचंद पडळकर हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलतात. सीमाभागातील कन्नड विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ लक्ष घालावे. आमच्या वतीने त्यांना ही बाब कळवली असून लवकरच योग्य निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. निश्चितच आमदार गोपीचंद पडळकर याच्यावर मार्ग काढतील यात शंका नाही.
श्री. सोमनिंग बोरामणी, भाजप जत पूर्व भाग अध्यक्ष








