मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी, कन्नडबरोबर मराठीतही फलकाची मागणी
प्रतिनिधी /बातमीदार
खानापूर येथील तालुका सार्वजनिक इस्पितळाच्या इमारतीवर नव्याने कन्नड भाषेत फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
खानापूर शहरासह तालुक्मयात बहुसंख्येने मराठी भाषिक आहेत. स्थानिक लोकांना कोणते शासकीय कार्यालय आहे, हे कळण्यासाठी त्यांच्या भाषेत फलक असणे गरजेचे आहे. कर्नाटकची राज्यभाषा कन्नड असली तरी प्रथम कन्नड व त्यानंतर स्थानिक लोकांना कळणारी भाषा म्हणून त्या भाषेत फलक असावा. खानापूर तालुक्मयात मराठी भाषिकांची संख्या जास्त असल्याने कन्नड बरोबरच मराठीतील फलक लिहावा, अशी मागणी मराठी भाषेतून होत
आहे.
मराठीत फलक नसल्याने अडचण
खानापूर येथील या इस्पितळात रुग्णांवर चांगला उपचार होतो, म्हणून खानापूर शहरासह तालुक्मयाच्या विविध भागातून अनेक लोक उपचारार्थ येतात. गोरगरीब जनतेची मोठी गर्दी या ठिकाणी असते. दवाखान्यातील वॉर्डातून मराठीमध्ये फलक नसल्याने कुणाला विचारावे व कोठे जावे, असा गोंधळ निर्माण होतो. दवाखान्याच्या सर्व वार्डांची माहिती व्हावी म्हणून त्या ठिकाणीही कन्नडबरोबर मराठीत फलक लावल्यास सोयीचे होणार आहे.
कारवारमधील कोंकणी भाषिक लोक कोंकणी भाषेतील फलकासाठी एकत्र येतात. स्थानिक भाषेत फलक असावेत असा ठराव मांडतात. खानापूर तालुक्यात 70 टक्क्याहून अधिक मराठी भाषिक आहेत. परंतू भाषेसाठी एकत्र येऊन आंदोलन होत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढावे, असे आवाहन चापगाव ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी केले आहे.









