ग्रा. पं. च्या कारभारात ढवळाढवळ, जनतेतून संताप
बेळगाव : मराठीची कावीळ असलेल्या काही कानडी संघटनांकडून आता ग्राम पंचायतींना लक्ष्य केले जात आहे. बेळगावनजीकच्या एका ग्राम पंचायतीने कचरापट्टीसाठी मराठीतून पावती दिली म्हणून आता काही संघटनांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त होत असून स्थानिकांना जी भाषा समजते, त्या भाषेत कचरापट्टीची पावती दिली तर गैर काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ग्राम पंचायत बेनकनहळ्ळीच्यावतीने गणेशपूर, सरस्वतीनगर, क्रांतीनगर परिसरात कचरा उचल केली जाते. दुकानदारांना कचरापट्टीची पावती दिली जाते. ही पावती मराठीतून असल्याने कानडी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बेळगाव व आसपासच्या परिसरात मराठीचे प्राबल्य अधिक असल्यामुळे वर्षानुवर्षे ग्राम पंचायती मराठीतूनच कारभार चालवत आहेत.
गावातील नागरिकांना इतर भाषा अवगत नसल्याने त्यांच्यासाठी सर्व कामकाज मराठीतून चालविले जाते. नेहमीच मराठीची कावीळ असलेल्या कानडी संघटनांकडून मराठीचे खच्चीकरण कसे होईल, याकडेच लक्ष दिले जाते. दोन दिवसांपूर्वी शहापूर परिसरातील मराठी फलक काढण्यास भाग पाडण्यात आले. आता एका संघटनेने बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीतील मराठी भाषेतील पावतीवरून वादंग निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारांमुळे मराठी व कानडी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संघटनेने केवळ विरोधच न करता संबंधित ग्राम पंचायतीच्या पीडीओ व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. ज्या गावामध्ये मराठी भाषिक अधिक आहेत, त्या गावातील नागरिकांना मराठीतून कराची पावती दिली तर चुकीचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता मराठी भाषिकांनीही याविरोधात लढा उभारणे गरजेचे बनले आहे.









