गणेशोत्सव मंडळांच्या एकीमुळे काढला पळ : कन्नडसक्तीबाबत गणेशभक्तांमध्ये संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रशासनाकडून गणेशोत्सव मंडळाचा फलक काढण्याचा प्रकार झाल्यानंतर आता एका कन्नड संघटनेकडून गणेशोत्सव फलकाला लक्ष्य केले जात आहे. शनिवारी पाटील गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचा फलक काढण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते आले होते. परंतु, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होताच परिस्थिती बिघडू नये, यासाठी पोलिसांनी ताबडतोब तेथून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हलवले. कन्नड सक्तीबाबतच्या घटना बेळगाव शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर तर या संघटनेला चेव चढला आहे. आठ दिवसांपूर्वी पाटील गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचा फलक कन्नड भाषेत उल्लेख नसल्याने महापालिकेने हटवला होता. गणेशभक्तांचा वाढता संताप लक्षात येताच प्रशासनाने तो फलक पुन्हा बसवला. परंतु, काही कन्नड संघटनांच्या कुरघोड्या मात्र सुरूच आहेत. मागील चार दिवसांपूर्वी एका संघटनेने आपल्या ग्रुपमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या फलकाचा फोटो टाकत कारवाईची मागणी केली होती.
शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास या संघटनेची महिला व काही कार्यकर्ते शनिमंदिर परिसरात दाखल झाले. फलक काढण्यासाठी त्यांची तयारी सुरू असल्याचे दिसताच गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते दाखल होऊ लागले. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढताच पोलिसांनी या महिला कार्यकर्तीसह इतरांना वाहनात घालून नेले. महामंडळाचे पदाधिकारी रणजित चव्हाण-पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. रमाकांत कोंडुसकर यांनी फोनवरून पोलीस आयुक्तांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
मंडळांच्या एकीमुळे काढला पळ
पाटील गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचा फलक काढण्यासाठी या संघटनेचे काही कार्यकर्ते आल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवर पडताच आसपासच्या भागातील गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. शहापूर, बेळगाव, तसेच परिसरातील कार्यकर्ते जमा होताच एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना तेथून पोलिसांच्या आश्रयाखाली पळ काढावा लागला. त्यामुळे यापुढेही गणेशोत्सव मंडळांनी अशीच एकी दाखविणे गरजेचे आहे.
प्रशासनाकडून कार्यकर्त्यांवर दबाव…
बेळगावमधील गणेशोत्सवाला शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. शहरातील मराठी व कन्नड, तसेच इतर भाषिक वर्षानुवर्षे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु, याच वर्षापासून गणेशोत्सवामध्ये कानडीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. फलकांवर लहानशा अक्षरात का असेना पण कन्नडचा उल्लेख करावा, अशी विनंती प्रशासनाकडून कार्यकर्त्यांना केली जात आहे.









