मराठी बोलायचे असेल तर महाराष्ट्रात निघून जा : हा भाषिक भेद नाही का? मराठी भाषिकांचा सवाल
बेळगाव : बेळगावमधील भाषिक वाद उकरून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनेच्या म्होरक्याने रविवारी पुन्हा एकदा बेताल वक्तव्ये केली. ‘मराठी बोलायचे असेल तर महाराष्ट्रात निघून जा, जाण्याचा खर्च आम्ही करू’, तसेच ‘काळा दिन पाळणाऱ्यांना सोडू नका’ अशी चिथावणीखोर वक्तव्ये करून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एरवी भाषिक वादातून मराठी भाषिकांवर कारवाई करणारा पोलीस विभाग आता मात्र मूग गिळून गप्प असल्याचे दिसून आले. बेळगाववर आपला हक्क दाखवून देण्यासाठी एका कन्नड संघटनेचा म्होरक्या रविवारी बेळगावमध्ये आला होता. मराठी व कन्नड भाषिक सौहार्दाने येथे रहात असताना भाषिक वाद पेटविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पुन्हा करण्यात आला. कन्नड संघटनांना खूश करण्यासाठी मराठी भाषिकांवर तोंडसुख घेण्यात आले. 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काळादिन आचरणात आणला जातो. तसा प्रयत्न झाल्यास गप्प बसू नका, तुरुंगात गेलात तरी आम्ही तुम्हाला बाहेर काढू, असे चिथावणीखोर वक्तव्य त्या म्होरक्याने काढूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मात्र, सनदशीर मार्गाने पूर्वपरवानगीचा अर्ज देऊन मोर्चा काढणाऱ्या मराठी भाषिकांवर भाषिक तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल केले जातात. ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
अन्यथा जशास तसे उत्तर देऊ…
भाषावार प्रांतरचनेने मराठी भूभाग कानडी प्रांताला जोडण्यात आला. परंतु, शेकडो वर्षांपासून येथे मराठी भाषिक संस्कृती टिकवून आहेत. त्यामुळे कोणत्याही म्होरक्याने बेळगावमध्ये येऊन मराठी भाषिकांना आव्हान देऊ नये, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा पवित्रा मराठी भाषिकांनी घेतला आहे.









