शहर म. ए. समितीचा निर्धार : गल्लोगल्ली जागृती करण्याचे आवाहन
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. हा महामोर्चा कोणत्याही भाषेविरुद्ध नसून मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि अस्मितेसाठी हा महामोर्चा यशस्वी करणारच, असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. शहर म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवारी रंगुबाई भोसले पॅलेस येथे पार पडली. बैठकीला शहर म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर व ज्येष्ठ नेते रणजित चव्हाण-पाटील उपस्थित होते. या बैठकीमध्ये कन्नडसक्ती, तसेच गणेशोत्सव मंडळांना प्रशासनाकडून होत असलेला त्रास याविषयी कार्यकर्त्यांनी मते मांडली. धर्मवीर संभाजी चौकापासून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे.
केंद्र सरकारवर दबाव आणा
नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपल्याला महाराष्ट्रातील आमदार, खासदार, तसेच लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत केंद्र सरकारवर दबाव आणावा लागेल. कर्नाटक सरकारने ज्याप्रकारे इतर राज्यांना पत्र पाठवून तेथील कन्नड भाषिकांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेही तसे पत्र कर्नाटक सरकारला पाठविण्याची विनंती केली आहे. यावेळी अॅड. अमर येळ्ळूरकर, श्रीकांत कदम, नेताजी जाधव, रणजीत हावळाण्णाचे, प्रकाश मरगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीत 11 तारीखचा मोर्चा यशस्वी करून कन्नडसक्ती जुगारण्यासंदर्भात एक वाक्यता दिसून आली आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकांचे वाटप करून जनजागृती
कन्नडसक्ती विरोधातील मोर्चासाठी गल्लोगल्ली जागृती करण्याचे आवाहन शहर म. ए. समितीने केले. त्यामुळे शहर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठक संपताच रामलिंगखिंड गल्ली येथे पत्रकांचे वाटप करून जनजागृती केली. म. ए. समितीचे कार्यकर्ते मोतेश बार्देशकर, अॅड. अमर येळ्ळूकर, रमाकांत कोंडुसकर, श्रीकांत कदम यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पत्रकांचे वाटप केले.









