म. ए. समिती युवा आघाडीतर्फे लक्ष्मी मंदिरात बैठक
वार्ताहर/हिंडलगा
कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्या संदर्भात हिंडलगा येथील म. ए. समिती युवा आघाडीतर्फे दि. 7 रोजी संध्याकाळी 8 वाजता गावातील लक्ष्मी मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्य यल्लाप्पा काकतकर उपस्थित होते.
या जागृती संदर्भात ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर, अनिल हेगडे, नागेश किल्लेकर, म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष विनायक पावशे यांनी आपल्या भाषणातून भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सीमाभागात बहुसंख्येने मराठी बोलणारे नागरिक असताना देखील सर्वत्र कानडीकरण केले जात आहे. त्या विरोधात हा समितीमार्फत काढला जाणारा भव्य मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घरोघरी जागृती करावी असे आवाहन केले.
गावातील प्रमुख गल्लीतील नागरिकांना तसेच युवकांना या मोर्चा संदर्भात माहिती देऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी घरोघरी पत्रके वाटली. तसेच गावातील महिला मंडळातील सभासदांना देखील मराठी भाषेचे महत्त्व सांगून मोठ्या संख्येने उपस्थित होण्यासाठी जागृती केली. या जागृती फेरीत सुनील अगसगेकर, भाऊराव कुडचीकर, बाळू सांगावकर, दिनेश किल्लेकर, अर्जुन जकाने, संतोष मंडलिक यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.









