चोर्लाजवळ टेम्पोची दुचाकीला जोराची धडक
वार्ताहर/ कणकुंबी
बेळगाव-गोवा रस्त्यावरील चोर्लाजवळील अपघातात कणकुंबीचा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी 8 वाजता घडली. विक्रम लक्ष्मण कोळेकर (वय 28) राहणार कणकुंबी असे मयत युवकाचे नाव आहे. तो कणकुंबीहून गोव्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या केए 22 डी 2273 या अशोक लेलँड टेम्पोने समोरासमोर ठोकरल्याने केए 22 एचएस 3074 या दुचाकीवरील युवक ठार झाला. धडक इतकी जोरदार होती की विक्रम दहा फूट उडून पडला. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.
विक्रम कोळेकर हा गोव्यातील फेडरल बँकेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून नोकरीला होता. विक्रम मूळचा कणकुंबीचा असला तरी त्याचे आई-वडील कामानिमित्त बेळगावला होते. शनिवारी सकाळी बेळगावहून तो गोव्याला जात असताना चोर्लानजीकच्या छोट्या वळणावर टेम्पोने समोरासमोर धडक दिल्याने तो जागीच गतप्राण झाला. कणकुंबीतील श्री माउली विद्यालयाचा तो एक हुशार माजी विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याने बँकिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर फेडरल बँकेत बेंगळूरला दोन वर्षे सेवा बजावून गोव्यामध्ये आला होता. गरीब परिस्थितीमुळे आई-वडिलांनी बेळगावमध्ये स्वीट मार्ट व हॉटेलमध्ये काम करून मुलाला शिकवले होते. परंतु दुर्दैवाने विक्रमचा अपघाती मृत्यू झाल्याने कोळेकर कुटुंबीयांवर आघात झाला आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह खानापूरला नेऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिला. खानापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.









