कणकुंबी,चिगुळे,कोदाळी,केंद्रे,चंदगड येथील पालख्यांच्या भेटीचा सोहळा अवर्णनीय उत्साहात
वार्ताहर /कणकुंबी
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या कणकुंबी येथील श्री माउली देवी यात्रोत्सवाची बुधवार दि. 15 रोजी सांगता होत आहे. कणकुंबी, चिगुळे, कोदाळी-गुळंब-कळसगादे, केंद्रे-वीजघर या श्री माउली देवींचा दर बारा वर्षांनी होणारा भेटीचा सोहळा दि. 12 रोजी लाखेंच्या उपस्थित पार पडला. या वेळेची यात्रा कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पुढे ढकलून चौदा वर्षांनी आयोजित करण्यात आली होती.
या यात्रोत्सवाच्या निमित्ताने कणकुंबीमध्ये बुधवार दि. 8 फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बुधवारी या यात्रोत्सवाची धार्मिक कार्यक्रमांनी सांगता होत आहे. यात्रोत्सवामध्ये लाखो भाविकांनी माऊली देवींचे दर्शन घेतले. बुधवारी यात्रोत्सवाच्या सांगता सोहळ्यात सकाळी महाअभिषेक, आरती, नैवेद्य, विविध धार्मिक विधी, सामुदायिक प्रार्थना, महासंकल्प, मानपान आणि त्यानंतर सर्व माऊली देवींच्या पालख्यांची धुळ्याच्या वरंड्याकडे मिरवणूक निघणार आहे. त्या ठिकाणी धार्मिक विधी झाल्यानंतर चिगुळे व कोदाळी गावच्या माऊली देवींना निरोप देऊन कणकुंबी माऊली देवीची पालखी माघारी येणार आहे. अशाप्रकारे आठ दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. रविवारी यात्रोत्सवाला अफाट जनसागर लोटला होता. माऊली देवींच्या भेटीनंतर मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात माऊली देवींच्या पालख्यांसाठी खास आसन व्यवस्था करून ठेवण्यात आल्या. त्यानंतर भक्तांना ओटी भरण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मुभा देण्यात आली. दोन-तीन दिवसात हजारो लोकांनी रात्रंदिवस रांगेत उभे राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. ओटी भरण्यासाठी महिलांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर देवस्थान कमिटीने व कणकुंबी ग्राम पंचायतीने भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावषीच्या यात्रेत चंदगड तालुक्मयाचे दैवत रवळनाथ देवस्थानची पालखी सोमवार दि. 13 रोजी कणकुंबीत दाखल झाली. कणकुंबी देवस्थान कमिटीच्यावतीने या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. सभामंडपात वेगवेगळी आसन व्यवस्था करून रवळनाथ देवाची पालखी, कणकुंबी माउली देवीची पालखी, कोदाळी माउलीची पालखी व चिगुळे माऊलीची पालखी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कणकुंबी श्री माऊली देवी विश्वस्त मंडळ, कणकुंबी ग्रा.पं. यांनी विशेष परिश्र्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भक्तांसाठी बेळगाव व खानापूरहून बसची व्यवस्था केली होती. लोकमान्य सोसायटीतर्फे अॅम्बुलन्सची व्यवस्था होती. कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने 24 तास आरोग्य सेवा ठेवली होती. केएलई इस्पितळाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.









