खंडित वीजपुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत : नागरिकांचे विजेअभावी प्रचंड हाल : हेस्कॉमचे दुरुस्ती करण्यात अपयश
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी-जांबोटी भागात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दररोज अनियमित वीजपुरवठा होत असल्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. मोफत वीजपुरवठ्याचे आमिष दाखवून खंडित वीजपुरवठा करण्यापेक्षा पैसे घ्या, आणि नियमित वीजपुरवठा द्या, असे म्हणण्याची वेळ कणकुंबी जांबोटी भागातील नागरिकांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जांबोटी-कणकुंबी भागात अनियमित वीजपुरवठ्यामुळे व वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या पावसाळ्dयात विजेचा जेवढा लपंडाव झाला नाही त्यापेक्षा अधिक लपंडाव उन्हाळ्dयाबरोबरच आता सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे देखील सुरूच आहे.
अनेक दिवसांपासून दिवसभर तर वीज नाहीच. पण रात्रीदेखील वीज गायबच होत आहे. त्यामुळे हेस्कॉमचा ‘रात्रीस खेळ चाले’ अशीच गत झाली आहे. कणकुंबी भागातील सुरळीत वीजपुरवठ्याच्या बाबतीत हेस्कॉमचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी जांबोटी, कणकुंबी भागात वीजपुरवठ्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतरच्या काळात अशा पद्धतीने कधीही खंडित विद्युत पुरवठ्याचा त्रास होत नव्हता. केवळ पावसाळ्dयात एखाद्या ठिकाणी जंगलमय भागात खांबावर किंवा तारेवर एखादं झाड कोसळले किंवा तार तुटून पडली तरच एक-दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित होत होता. परंतु यावर्षी गेले आठ-दहा महिने कणकुंबी परिसराबरोबरच जांबोटी भागातील सर्व गावांना अनियमित वीजपुरवठा होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
कणकुंबीत विजेअभावी पाणीपुरवठा विस्कळीत
विशेषत: कणकुंबी तसेच इतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विजेवरच अवलंबून असून वीज नसल्याने प्रत्येक गावातील नळ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पावसाच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. तसेच संपर्काचे माध्यम असलेल्या मोबाईलबरोबरच दळप, कांडप, दूरध्वनी यंत्रणा याबरोबरच विजेवर चालणारी इतर सर्व उपकरणे कोलमडल्यामुळे नागरिकांना या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विजेअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागीलवर्षी कणकुंबी भागातील जवळपास दीडशे ते दोनशे महिलांनी खानापूर हेस्कॉम कार्यालयावर घागरी मोर्चाही काढला होता. परंतु पोकळ आश्वासनापलीकडे काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे कणकुंबी आणि परिसरातील जनता आता पूर्णपणे वैतागलेली असून हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. वीजसमस्या सोडविण्यासाठी हेस्कॉम अधिकाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.
क्षुल्लक कारणासाठी कणकुंबी भाग अंधारात
जांबोटी-कणकुंबी भागात होणाऱ्या वीजपुरवठ्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास किंवा एखादे तांत्रिक बिघाड झाल्यास जांबोटी येथूनच कणकुंबी भागातील सर्व विद्युतपुरवठा खंडित (बंदच) केला जातो. सायंकाळी पाच-सहा वाजल्यानंतर विजेची समस्या निर्माण झाल्यास लाईनमन जांबोटीमधूनच पुढील सर्व गावांचा वीजपुरवठा बंद करतात. त्यामुळे कणकुंबी भागातील सर्व गावांतील नागरिकांना अंधारात वावरावे लागते. असा प्रकार नेहमीच घडत आहे. दिवसातून केवळ एक-दोन तासच विद्युत पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात दिवसाच्या चोवीस तासांपैकी एक ते दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना अनियमित विजेची डोकेदुखी ठरली आहे. घरात दिवे पेटवण्यासाठी रेशन दुकानातून रॉकेलही मिळत नाही. अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. हेस्कॉम अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी वेळीच लक्ष घालून कणकुंबी भागात विद्युत पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा खानापूर हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
हेस्कॉमच्या जांबोटी भागात केवळ तीनच लाईनमन
खानापूर तालुक्याचा जांबोटी, कणकुंबी हा भाग डोंगराळ व दुर्गम भागात विद्युतपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान दहा-बारा लाईनमनची गरज आहे. पूर्वी या भागात 12 लाईनमन होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून हेस्कॉमकडे जांबोटी भागासाठी केवळ तीनच लाईनमन आहेत. त्यामुळे या भागातील जवळपास तीस ते चाळीस गावांचा विद्युत पुरवठा सांभाळणे तीन लाईनमनना अवघड जात आहे. वास्तविक हेस्कॉमकडे पुरेसा कर्मचारी वर्ग असेल तर सुरळीत विद्युत पुरवठा होण्यास अडचण होणार नाही. मात्र अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे हेस्कॉमची डोकेदुखी वाढली आहे.









