कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे नागरिकांना त्रास : काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी गावासाठी केंद्र सरकारची घरोघरी नळयोजना म्हणजे जलजीवन मिशन राबविण्यात येत असून या योजनेच्या कंत्राटदाराकडून वेळ काढूपणा सुरू असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कणकुंबी येथे मलप्रभा नदीचे उगमस्थान आहे. या भागात पावसाचे प्रमाण भरपूर असून हुबळी, धारवाड, सौंदत्ती व नवलगुंद आदी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मलप्रभा नदीच्या उगम स्थानावर असलेल्या कणकुंबी गावातील नागरिकांना उन्हाळ्dयात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारतर्फे घरोघरी नळ योजनेद्वारे पिण्याचे पाणी देण्याची योजना राबविण्यात येत आहे. कणकुंबी गावात राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराने सदर काम सुरू करून तीन-चार महिने झाले. मात्र सदर काम अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील मुख्य रस्ता किंवा गल्ली गल्लीमधील रस्ता मधोमध फोडण्यात आला असून वाहने चालवताना दमछाक होत आहे. आजकाल प्रत्येक नागरिकांच्या घरी दुचाकी तर काही नागरिकांच्या घरी चारचाकी वाहने असल्याने या योजनेच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे गावात दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. गावातील गल्ली गल्लीमधून वाहन चालविणे किंवा आपापल्या घरासमोरील पार्किंग व्यवस्था कोलमडून पडली आहे. कंत्राटदाराकडून वेळकाढूपणा सुरू असून हाती घेण्यात आलेल्या कामाबद्दल नागरिकांमधून असंतोष पसरला आहे. जेसीबीद्वारे रस्ता फोडण्यात आलेला असून काही ठिकाणी सध्या सुरू असलेल्या नळपाणी योजनेचे पाईप उखडून काढल्याने काही गल्लीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे
नागरिकात तीव्र नाराजी
येथील हायस्कूलच्या पाठीमागील बाजूने गेलेल्या पाईपलाईनचे काम चालू असताना जेसीबीच्या साहाय्याने पाईप फोडल्याने हायस्कूलला सुद्धा चार-पाच दिवसापासून पाणीटंचाई निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार चालवणे मुश्कील होऊन बसले होते. एकंदरीत कंत्राटदाराचे दुर्लक्ष व वेळ काढूपणामुळे कणकुंबी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित वरिष्ठांनी अर्धवट स्थितीत राहिलेल्या कामाची पाहणी करून कंत्राटदाराला समज द्यावी व जलजीवन मिशनचे काम त्वरित पूर्ण करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









