वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी येथील श्री माऊली इलेव्हन यंगस्टर्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकुंबी टी-20 चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून उत्साहात सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला 41 हजार रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला 25 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तृतीय व चतुर्थ संघांना देखील चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक, सलग तीन चौकार, तीन षटकार, तीन बळी, मालिकावीर व उदयोन्मुख खेळाडू अशा विविध खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संघाचे उद्घाटन श्री माऊली देवी देवस्थानचे उपाध्यक्ष राजाराम गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. माजी सदस्य भिकाजी महाले, कृष्णा नाईक, फॉरेस्ट गार्ड रायण्णा शिवन्नवर, नंदकुमार गावडे, महेश नाईक, प्रयाग पित्रे व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते. संघाचे प्रमुख अरुण गावडे, राजन गुरव, राज गावडे, भरत गुरव, कुमार चोर्लेकर, विनायक गावडे व किरण घाडी आदी उपस्थित होते.









