‘नमना’ने होईल सुरुवात, प्रत्यक्ष ‘मेळां’ना 2 मार्चपासून प्रारंभ, तालुक्यात विविध समाजांचे स्वतंत्र ‘मेळ’
काणकोण : काणकोण तालुक्यातील पारंपरिक शिमगोत्सवाला उद्या 28 पासून ‘नमना’ने सुरुवात होत असून प्रत्यक्ष मेळांना 2 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या तालुक्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये विविध समाजांचे स्वतंत्र मेळ आहेत. एकट्या लोलये-पोळे पंचायतीमध्ये पोळेकार, पेडेकार, शेळीकार, आगसकार, कारयकार, ताणशीकार, वीरामेळ असे स्वतंत्र मेळ असून दशमीच्या दिवशी हे सर्व मेळ तामणे वाड्यावर एकत्र येत असतात. वर्षातून एकदा येणाऱ्या या पारंपरिक उत्सवाची मजा लुटण्यासाठी आणि प्रत्यक्ष मेळात सहभागी होण्यासाठी कामधंद्याच्या निमित्ताने काणकोणबाहेर स्थायिक झालेले लोकही आपल्या गावाकडे परतत असतात. ही परंपरा मागच्या कित्येक पिढ्यांपासून चालू असून यापुढे देखील ती चालू ठेवण्याकडे आजचा युवक लक्ष देत असल्याचे दिसून येते.
पैंगीणचा ‘मांडपकारांचा मेळ’ हा ठरावीक एका समाजापुरता मर्यादित असून त्या मेळाला ‘दहा जणांचा मेळ’ म्हणून ओळखले जाते. हा मेळ पैंगीण पंचायत क्षेत्रातील वेलवाडा, गाळये, खावट, पर्तगाळी, महालवाडा, कोळसर, मागदाळ, तळपणपर्यंत खेळला जातो. या मेळाचे स्वतंत्र मांड आहेत. त्याचबरोबर या मांडाचा मांडेली, गाणेली, घुमटेली, तोणेली असतो. प्रत्येकाची जबाबदारी स्वतंत्र अशी असते आणि परंपरेने त्या त्या घराण्याकडे ती चालून येते. पैंगीणच्या मेळाबरोबर देवाचा किवा वीरांचा मेळ असतो. या मेळाला प्रथम स्थान दिले जाते. काणकोण पालिका क्षेत्रात पाळोळे, नगर्से, पाटणे, देवाबाग भागांत क्षत्रिय मराठा समाजाचे मेळ आहेत. त्याशिवाय नाईक समाज, कोमरपंत समाज यांचे स्वतंत्र मेळ आहेत. सादोळशे, गालजीबाग, तळपण भागांत पागी समाजाचे मेळ आहेत. पासल, अर्धफोंड या भागांतही स्वतंत्र मेळ आहेत. त्याशिवाय आगोंद, खोल, खोतीगाव, गावडोंगरी या भागांत आदिवासी समाजाचे, तर दाबेल भागात धनगर समाजाचे मेळ आहेत.
आदिवासी समाजाकडून परंपरेचे जतन
शिमगोत्सवाची खरी परंपरा आदिवासी समाजाने जपून ठेवली आहे. खोतीगाव, गावडोंगरी भागांतील आदिवासी समाजाचे मेळ ‘दांड्या’वरून सुरू होतात. या ‘दांड्या’वर पंधरा दिवस अगोदर वस्ती केली जाते. त्या ठिकाणी नवीन पिढीला ‘मेळा’तील विविध प्रकार शिकविले जातात. महिला वर्गही विविध कामांत गर्क असतो. बहुतेक सर्वच मेळांत घुमट, शामेळ, झांज ही वाद्ये असतात. काही भागांत शहनाई, सूर्त यांचा, तर काही भागांत ढोल-ताशांचा केला जातो. काही ‘खेळगडे’ हातात रंगीबेरंगी ‘तोणयो’, गळ्यात फुलांच्या माळा, डोक्याला मुंडासे बांधून बाहेर पडतात. पूर्वीच्या काळात नवमीच्या दिवशी ‘नमन’ घालून पारंपरिक मेळाला सुरुवात झाल्यावर पौर्णिमेच्या दिवशी होळीने शिमग्याची समाप्ती झाल्यानंतरच खेळगडे आपापल्या घरी परतत असत. शिमग्याच्या मेळांत सहभागी झालेले खेळगडे पूर्वी पायात चप्पल वापरत नसत तसेच मेळांत वापरलेले कपडे घरात घेत नसत. शिमग्याच्या काळातच श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाच्या श्री अवतार पुरुषाच्या तरंगोत्सवाला प्रारंभ होत असतो. होळीनंतर या तालुक्यातील श्रीस्थळ-गावडोंगरी, खोतीगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थाने, पैंगीण येथील श्री परशुराम देवस्थान, कुळटी येथील श्री गुरू प्रदेशी देवस्थान येथे वार्षिक दिवजोत्सव आणि जत्रोत्सव होतात.
वैशिष्ट्यापूर्ण जेवणावळी
या तालुक्यातील विशेषता पालिका क्षेत्रांतील भगतवाडा, किंदळे, पणसुले, पाळोळे, चावडी, नगर्से, चार रस्ता या भागांत जेवणावळीचा वैशिष्ट्यापूर्ण कार्यक्रम होत असतो. खोल पंचायत क्षेत्रात सारस्वत समाजाकडून आगळावेगळा शिमगा खेळला जातो. येणारा संपूर्ण आठवडा हा शिमगोत्सव, दिवजोत्सव आणि जत्रोत्सवांचा असून या काळात गावांमध्ये सर्वत्र खाण्यापिण्याची रेलचेल, पाहुण्यांची वर्दळ, दूरवर असलेल्या गावबंधूंची गावात झालेली गर्दी पाहायला मिळते. पुनवेच्या दिवशी मांड मोडला जातो. त्यावेळी मांडावर विविध धार्मिक विधी केले जातात. काही ठिकाणी मांडावर गडे पडत असतात. हे गडे देखील परंपरेने चालत आलेले आहेत. काही भागांत काही जणांच्या अंगणात गडे पडतात. शिमग्याच्या आणि वर्षातून एकदा येणाऱ्या खेळगड्यांच्या स्वागतासाठी आपल्या घरासमोरचे अंगण शेणाने सारवून, तुळशीसमोर रांगोळी घालून वाट पाहिली जाते. सरकारी स्तरावर कितीही शिमगोत्सव साजरा झाला, तरी या पारंपरिक शिमगोत्सवाची मजा काही औरच असते.









