एकूण 38 इंच पाऊस, कुडय-खोल येथे घरावर माड पडल्याने हानी, विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार
काणकोण : काणकोण तालुक्यात मागच्या दोन दिवसांत पावसाने जोर लावला असून 5 रोजी एकाच दिवसात 7 इंच इतक्या पावसाची नोंद या तालुक्यात झाली. जून महिन्यापासून 5 जुलैपर्यंत या तालुक्यात एकूण 38 इंच इतका पाऊस पडला आहे. मागच्या दोन दिवसांतील सततच्या पावसामुळे काणकोण तालुक्यातील गालजीबाग आणि तळपण नद्या तुडुंब भरून वाहायला लागल्या आहेत. सर्वत्र शेतजमिनीत पाणी साचले आहे. काही भागांत रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. किनारी भागांत मोठ्या प्रमाणात या पावसाचा परिणाम झालेला असून दर्याला उधाण आल्यामुळे भरतीरेषा पार करून पाणी आंत शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. काणकोण नगरपालिका क्षेत्रातील चावडी, चार रस्ता त्याचप्रमाणे देवाबाग, गालजीबाग आणि अन्य ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे.
खोल पंचायत क्षेत्रातील कुडय येथील चंद्रू बामटू वेळीप यांच्या घरावर माड पडल्यामुळे त्यांच्या घराची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काणकोणच्या अग्निशामक दलाच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन घरावर पडलेला माड बाजूला केला. सुदैवाने या ठिकाणी मनुष्यहानी घडली नाही. या घटनेची खबर काणकोणच्या मामलेदार कार्यालयात मिळताच सदर कार्यालयातील सर्कल निरीक्षक रोहिदास वेळीप, स्थानिक तलाठी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जागेचे सर्वेक्षण केले. काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस आणि अग्निशामक दलाचे प्रमुख रवींद्रनाथ पेडणेकर आपत्कालीन व्यवस्थेवर लक्ष ठेवून असून त्यासाठी मामलेदार कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या 9529050351 या क्रमांकाबरोबरच उपजिल्हाधिकारी (9404758575), मामलेदार (9422846673), पोलीस निरीक्षक (7875756047) किंवा अग्निशामक दल (9890503272) यांच्याशी पावसाळ्याच्या दिवसांत आपत्कालीन सेवेसाठी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









