कोमुनिदाद प्रशासकांकडून आगोंद पंचायत क्षेत्रातील 78 घरे पाडण्याचा आदेश, घरमालकांमध्ये घबराट
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण कोमुनिदादीच्या आगोंद पंचायतीमधील वाल, पारवे, काराशिरमळ या ठिकाणच्या जमिनींवर बांधण्यात आलेली जवळजवळ 78 घरे पाडण्याचा आदेश कोमुनिदादीच्या प्रशासकांनी दिला असून येत्या 18 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात येणार असल्याच्या वृत्तामुळे या घरमालकांमध्ये घबराट पसरली आहे.
कोमुनिदादीच्या मालकीच्या या जमिनींत कसलेच सोपस्कार न करता ही बांधकामे उभारण्यात आलेली आहेत. यासंबंधीची तक्रार कोमुनिदादीच्या भागधारकांनी केली होती. त्याचप्रमाणे हा प्रश्न काणकोण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. या जमिनींवरील बांधकामे हटविण्यासंदर्भातील नोटिसा आठ महिन्यांपूर्वी संबंधिताना पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील काही घरांमध्ये लोक राहत आहेत, तर काही ठिकाणी बांधकामे उभारून ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी कुंपण उभारून जागा अडवून ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. एक प्रकारे जमीन बळकावण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. संबंधितांना नोटिसा पाठविल्या त्यावेळी बऱ्याच ठिकाणची घरे बंद होती. त्या घरांवर नोटिसा चिकटविण्यात आलेल्या आहेत. मात्र मागच्या आठ महिन्यांत संबंधितांनी कसलीच हालचाल केली नाही, असा दावा कोमुनिदादीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला.
काँग्रेस, आप नेत्यांची घरमालकांशी चर्चा
आगोंद पंचायतीमधील कोमुनिदादीच्या मालकीच्या जमिनींवरील बांधकामे पाडण्यात येणार असल्याची खबर मिळताच काँग्रेस नेते जनार्दन भंडारी आणि आम आदमी पक्षाचे नेते संदेश तेलेकर यांनी या जागी भेट देऊन काही घरमालकांशी चर्चा केली. या ठिकाणी घरे बांधून राहणाऱ्या व्यक्ती स्थानिक आहेत. गरीब, बहुजन समाजातील वा अल्पसंख्याक समाजातील हे नागरिक असून त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी भंडारी यांनी केली आहे. मुळातच हा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे कुणी कायदा हातात घेऊ शकत नाही. काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांने श्रमधाम योजनेखाली घर नसलेल्यांना घरे देण्याचा स्तुत्य असा उपक्रम हातात घेतला आहे. अशा वेळी ज्या भूमीहिनांनी आगोंद येथे घरे बांधलेली आहेत त्यांची घरे न पाडता त्यांना न्याय मिळवून देण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी तेलेकर यांनी केली आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री स्व. संजय बांदेकर यांच्या कारकिर्दीत कराशिरमळ, आगोंद येथील जमिनीवर उभारलेली घरे पाडण्याचा आदेश कोमुनिदादीच्या प्रशासकांनी दिला होता. मात्र बुलडोझरच्या साहाय्याने घरे पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली असता मंत्रिपदी असूनही कसलीच पर्वा न करता चक्क बुलडोझरच्या खाली झोपून त्या बांधकामांचा बचाव करण्याचे काम स्व. बांदेकर यांनी केले होते. त्याची आठवण यावेळी कित्येक जणांनी या प्रतिनिधीशी बोलताना करून दिली. काणकोणचे आमदार असलेल्या सभापतींनी या प्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.









