कंत्राटदार विरोधात न्यायालयात तक्रार : ‘माझा गाव माझा रस्ता’ योजनेंर्तगत कामाला सुरुवात
खानापूर : तालुक्यातील खानापूर-कांजळे ते हरसनवाडी रस्त्याचे काम न्यायालयाने नोटीस बजावताच कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत खानापूर तालुका ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती अशी की, माझा गाव माझा रस्ता योजनेंर्तगत 2017 साली सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून रस्ता करण्यात आला होता. तसेच या रस्त्याच्या पुढील पाच वर्षाच्या देखभालीसाठी 30 लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. या रस्त्याचे काम कंत्राटदाराने योग्य पद्धतीने केले नसल्याने पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता. याबाबत कंत्राटदाराकडे आणि संबंधित खात्याकडे तसेच लोकप्रतिनिधीकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार अर्जविनंत्या करूनदेखील याबाबत कोणतीच कारवाई होत नव्हती. यामुळे ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी कांजळे येथील वकील सोनाप्पा नांद्रणकर यांच्याकरवी कंत्राटदाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने याबाबत कंत्राटदाराला नोटीस बजावताच कंत्राटदाराने या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी कांजळे येथील पंच रवळू पाटील, रामचंद्र पाटील, मोनापा गावडे, तुकाराम वाणी, पुडलिक वाणी, रावजी पाटील, अशोक वाणी, पुंडलिक कुदळे, नामदेव वाणी, रवळू बैलुरकर, नारायण बैलुरकर, सातेरी बैलुरकर, लक्ष्मण सुतार आदीनी या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केले.









