मराठा साम्राजाच्या आरमारचे प्रमुख, दुर्गासारंग, सरखेल कान्होजी आंग्रेंच्या कार्य, शौर्य आणि कर्तृत्वावर प्रकाशझोत : लेटेस्ट तरुण मंडळाचा गणेशोत्सवानिमित्त सजीव देखावा : रविवारी होणार पाहण्यास खुला
कोल्हापूर प्रतिनिधी
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते. या आरमाराच्या माध्यमातून समुद्राच्या मार्गाने होणाऱ्या इंग्रज, पोर्तुगिज यांच्या आक्रमणावर नियंत्रण ठेवता येते याची जाणीव शिवरायांना होती. पुढे स्वराज्याचा विस्तार मराठा साम्राज्यात झाल्यानंतर शिवरायांनी उभारलेल्या आरमाराचे महत्व आणखीन अधोरेखित झाले. मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून तब्बल पंचवीसहून अधिक वर्षे समुद्रावर एकहाती राज्य करणारे, इंग्रज, पोर्तुगिज आणि मोगल यांना पराभूत करून आपल्या शौर्य, कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर मराठा इतिहासात अजरामर झालेले दर्यासागर, दर्याबहाद्दूर आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचा गौरवशाली इतिहास पुन्हा पाहण्याची संधी कोल्हापूरवासीयांना मिळणार आहे.
मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात सरखेल कान्होजी आंग्रे दर्यासागर, मराठा समाज्याचे आरमार प्रमुख नामक ऐतिहासिक सजीव देखावा साकारला आहे. या देखाव्याचे उद्घाटन रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीमंत शाहू छत्रपती आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
कोल्हापूरच्या गणेशोत्सवात दरवर्षी लेटेस्ट तरुण मंडळाचा ऐतिहासिक घटनेवरील सजीव देखावा आणि विसर्जन मिरवणुकीतील प्रबोधनपर रथ लक्षवेधी ठरत असतो. 1987 पासून आजपर्यंत दोन तीन वर्षांचा अपवाद वगळता लेटेस्टने ऐतिहासिक देखावे सादर करत आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित येऊन देखावा सादर करतात. त्यात भूमिका आणि इतर सर्व लहान मोठ्या गोष्टीही करतात.
यंदा मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ऐतिहासिक कामगिरीवर प्रकाशझोत टाकणारा सजीव देखावा लेटेस्टच्या कार्यकर्त्यांनी साकारला आहे. मंडळाचे संस्थापक तथा अध्यक्ष गजानन यादव आणि त्यांचे सहकारी कायकर्ते, पदाधिकारी गेल्या महिन्याभरापासून या देखाव्याच्या तयारीसाठी परिश्रम आणि कष्ट घेत आहेत. देखाव्यात विविध पात्रांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या रंगीत तालीम (सराव) सुरू आहे.
कोकणच्या सागरी किनारपट्टीवर वचक ठेवणारे कान्होजी आंग्रे
मराठा नौसेनेचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी कोकण किनारपट्टीवर तब्बल पंचवीस वर्षे एकहाती हुकूमत ठेवली. इंग्रज, पोर्तुगिजांवर त्यांचा वचक होता. समुद्रामार्गे व्यापार करणाऱ्यांना कान्होजींची परवानगी लागत असे. त्यांनी इंग्रज व पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते. तसेच त्यांचे आरमार शस्त्र सज्ज होते. 1688 च्या सुमारास मोगल बादशहा औरंगजेबचा सेनापती सिद्धी कासमला कान्होजी आंग्रे यांनी चतुराई आणि मुसद्देगिरीने पराभूत केले होते. औरंगजेबसाठी तो मोठा धक्का होता. आंग्रे यांना शिवपुत्र राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणींनी ‘सरखेल‘ ही पदवी दिली होती. तसेच सावंतवाडी ते मुंबई किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. परकीयांशी लढा देणाऱ्या कान्होजींच्या ताब्यात त्याकाळी कोकणबरोबर कच्छ, सौराष्ट्र, कोचीन, त्रावणकोटपर्यंतची किनारपट्टी होती.
कान्होजी यांनी कोकणातील मंदिरासह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थांनाना इनाम व रोख देणग्या दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. त्यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. त्यापैकी कान्होजी आंग्रे एक होते. 4 जुलै 1729 रोजी त्यांचे निधन झाले. मराठा सम्राज्यातील या शूरवीर महान योद्ध्यांवर शौर्याची कथा सजीव देखाव्याच्या माध्यमातून साकारली जाणार आहे.
देखाव्यातील कलाकार असे :
कान्होजी आंग्रे : अमित शिंदे, महाराणी छत्रपती ताराराणी : सुप्रिया निमावत, सिद्धी कासम : राजेंद्र दळवी (माजी फुटबॉल पंच), यांच्याबरोबर संभाजी यादव, राहुल यादव, शुभम पाटील, हेमंत रूईकर, अंतरिक्ष माळी, अंबिका पुजारी हे इतर कलाकार आहेत. देखाव्यात इंग्रज, पोर्तुगिज अधिकाऱ्यांचीही पात्रे आहेत.
तरुण भारतच्या लेखातून देखाव्याची प्रेरणा
तरुण भारत संवादच्या बुधवार 5 जुलै 2023 च्या खजाना पुरवणीत मुखपृष्ठावर कान्होजी आंग्रेचे छायाचित्र आणि आतील पानावर लेख प्रकाशित झाला होता. हा लेख वाचून लेटेस्ट मंडळाचे अध्यक्ष गजानन यादव यांना सजीव देखावा साकारण्याची कल्पना सुचली. त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत कन्होजी आंग्रे यांच्यावरी देखावा करण्याचे निश्चित केले. देखाव्यामागची कहाणी यादव यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितली.
ऐतिहासिक देखाव्याची परंपरा
लेटेस्ट तरुण मंडळाने 1987 पासून ऐतिहासिक सजीव देखावे साकारले आहेत. त्यामध्ये उमाजी नाईक, स्वातंत्र्यवीर सावरकर, चिमाजीराजे, लोकमान्य टिळक, डॉ. व्दारकानाथ कोटणीस, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, नेताजी सुभाषचंद्र बोस, द ग्रेट मराठा महादजी शिंदे, क्रांतीसिंह नाना पाटील, दामोदर चोपकर, शिवराय, टिळक आणि आज, राजर्षी शाहू महाराज, नेताजी पालकर, महाराणी येसुबाई, जालियनवाला बाग हत्याकांड.