त्वरित डांबरीकरण न केल्यास रास्ता रोको करण्याचा ग्रामस्थांचा इशारा : रस्ता खणून ठेवल्याने नागरिकांची वाढली डोकेदुखी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
बेळगाव शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कंग्राळी बुद्रक ते शाहूनगरपर्यंतच्या अवघ्या एक किलोमीटर अंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे भाग्य कधी उजळणार? अशी आर्त हाक कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांतून लोकप्रतिनिधी व शासनाकडे करण्यात येत आहे. ग्रा. पं. व ग्रामस्थांतर्फे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अनेकवेळा निवेदने देऊनसुद्धा कुणालाही याचे सुख-दु:ख नाही. ग्रामपंचायतही निवेदनाशिवाय कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि अन्य प्र्रवाशांना मात्र मोठ्याप्रमाणात हाल सोसावे लागत आहेत. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 8 वर्षांपूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण ग्रामीणच्या आमदार व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून केले आहे.
परंतू 3-4 वर्षांपासून नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरुन तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. सदर रस्ता करून घेण्यासाठी ग्रा. पं. ला नागरिकांनी अनेकवेळा विनंती केली. परंतु ग्रा. पं. सदस्यांनी गावच्या विकासकामापेक्षा अध्यक्ष बदलाबदलीमध्ये अधिक रस दाखविल्यामुळे 5 वर्षांच्या कारकिर्दीत पंचायतीचे 4 अध्यक्ष होऊनही विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. शाहूनगर हे महानगरपालिकेचे उपनगर आहे. या उपनगरापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर कंग्राळी बुद्रुक गाव असूनसुद्धा एक किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी गेली 5 वर्षे ग्रामस्थांनी शासन व लोकप्रतिनिधींकडे अर्जविनंत्या करून देखील रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, हे कंग्राळी बुद्रुक गावचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशाही संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
शहराचे सांडपाणी वाहून येणाऱ्या गावाकडे लोकप्रतिनिधी-शासनाची पाठ
कंग्राळी बुद्रुक गावच्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बेळगाव शहराची आझमनगर, शाहूनगर, वैभवनगर औद्योगिक वसाहत ही सारी नगरे वसली आहेत. परंतु या सर्व बेळगाव शहरांच्या उपनगरातील रहिवासी तसेच केएलई हॉस्पिटलचे संपूर्ण सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीतून वाहत जावून मार्कंडेय नदीला मिळत आहे. शासन व लोकप्रतिनिधीनी कंग्राळी बुद्रुक गाव आमच्यासाठी किती भाग्यवान आहे हा विचार करावा. कारण वरील सर्व उपनगरांचे सांडपाणी निमूटपणे वाहून घेत आहे. यामुळे या गावासाठी व गावच्या विकासासाठी कितीही मोठा निधी दिला तरी कमीच आहे. या गावचे योगदान मोठे आहे. परंतु 1 किलोमीटरच्या डांबरीकरण रस्त्यासाठी गावच्या नागरिकांना गेली 5 वर्षे झगडावे लागत आहे. ही मोठी खेदाची बाब आहे. जर गावच्या नागरिकांनी शहराच्या वरील उपनगरांचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक हद्दीत घेणे बंदच केले तर मोठा प्रलय निर्माण होईल, अशीही प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
निष्पापाचा बळी गेल्यावर रस्त्याचे डांबरीकरण होणार काय?
कंग्राळी बुद्रुक गावच्या नागरिकांना व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, राज्य परिवहन मंडळाने शाहूनगरमार्गे व केएलई हॉस्पिटलमार्गे दोन्हीकडून सकाळी 7 पासून ते रात्री 8 पर्यंत दर 15 मिनिटाला एक अशा बसेस सोडून गावचा मोठी सोय केली आहे. परंतु रस्त्याचे डांबरीकरण नसल्यामुळे खड्डेमय रस्त्यातून चालकांना तारेवरची कसरत करत बस चालवावी लागते. रस्त्याची रुंदी नियमाप्रमाणे कमी असल्यामुळे दोन्हीकडून बसेस आल्यास अगदी काटोकाट बसला साईड द्यावी लागते. अशावेळी जर बस घसरुन गटारीत पडून एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? शासन मृतांना पैसे देऊन त्याची मनधरणी करेल. परंतु एखाद्या विद्यार्थी अथवा नागरिक प्राणास मुकला तर त्यांच्या घरची परिस्थिती काय होईल? तेव्हा असे घडण्यापूर्वी लोकप्रतिनिधीनी व शासनाने रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करून नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी निरंजन जाधव, मल्लाप्पा पाटील व ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम ताबडतोब न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करू
बेळगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कंग्राळी बुद्रुक या गावच्या शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुकपर्यंतच्या मुख्य रस्त्याची अत्यंत खड्डेमय, दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून रस्ता शोधत रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांबरोबर वाहनधारकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कित्येक जणांचा अपघात झालेला आहे. मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो की तुम्ही एकदा या रस्त्यावरुन प्रवास करावा आणि या रस्त्याचा सुखद अनुभव घ्यावा. जेणेकरुन लोकप्रतिनिधीना थोडी रस्त्याची दया येईल. रस्त्याचे काम ताबडतोब न झाल्यास प्रसंगी गावकऱ्यांना सदर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणे भाग पडेल.
– अॅड. सुधीर चव्हाण
आमदारांनी स्वत: लक्ष घालून रस्त्याची दखल घ्यावी
शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक या गावच्या मुख्य रस्त्याला वाली कोण? असं म्हणण्याची परिस्थिती कंग्राळी बुद्रुकवासियांवर आली आहे. कारण अनेकवेळा ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्यांना निवेदन देऊनही या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. तसेच दुसरीकडे ग्रामीणच्या आमदार यांनासुद्धा निवेदन दिलेले आहे. काही महिन्यांपूर्वी आमदारांनी ग्रामीण भाग चकाचक करू, अशी वाच्यता केली होती. ग्रामपंचायत, आमदारांनी पाठ फिरवली तर सामान्य नागरिकांनी जावे कुठे, असा प्रश्न पडला आहे. ग्रामीण भागामध्ये लोकप्रतिनिधी असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झालेली आहे. तेव्हा आमदारांनी लक्ष घालून या रस्त्याची पाहणी करून यावर तोडगा काढावा.
– शंकर कोनेरी, सामाजिक कार्यकर्ते











